‘मधुसूदन उवाच’चे प्रकाशन

सातारा : विजय तेंडुलकर हे नाटककार म्हणून मोठे होतेच, मात्र कथा, कादंबरीकार म्हणून ते आपल्या लेखनावर फारसे समाधानी नव्हते. त्यातल्या त्यात त्याची नाटककारानंतर ओळख होती, ती कोवळी उन्हे या ललित लेखनामुळे. मात्र त्याला काही मर्यादा होत्या. मधुसूदन उवाच या मधुसूदन पतकी यांनी लिहिलेल्या पुस्तकांनी या मर्यादा ओलांडल्या आहेत. कोवळी उन्हेंपेक्षा हे लिखाण अधिक सरस आहे, दोन पावले पुढे आहे, असे उद्गार ज्येष्ठ लेखक, विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांनी काढले.
कौशिक प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या मधुसूदन उवाच या मधुसूदन पतकी यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.व्यासपीठावर कौशिकचे अरुण गोडबोले, लेखक प्रा. रमणलाल शहा, आकाशवाणी साताराचे अधिकारी सचिन प्रभुणे, मधुसूदन पतकी, प्रा. प्रकाश बोकील उपस्थित होते. दाभोलकर म्हणाले, मी तेंडुलकर यांचा अनेक वर्षे स्नेही होतो आणि पतकी यांचे लिखाण नक्कीच आपल्या एक पाऊल पुढे गेले आहे, हे त्यांनी मान्य केले असते. याचे कारण तेंडुलकरांनी व्यक्ती, प्रसंग याची एक चौकट घालून घेतली होती. पतकी यांनी ती चौकट ओलांडून ललित लेखन खूप पुढे नेले आहे. ललित चिंतन फारसा प्रचलित नसलेला पण हवाहवासा वाटणाऱ्या लेखन प्रकाराला लखूप ताजेपणानी वाचकांसमोर ठेवले आहे. ज्येष्ठ लेखक प्रताप गंगावणे, भालचंद्र कुलकर्णी, प्रा. डॉ. प्रशांत कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.