वन-पर्यावरण राखून बनतोय दिल्ली-डेहराडून एक्स्प्रेस-वे

वेळेची बचत
दिल्ली-सहारनपूरचे अंतर सहा तासांऐवजी अडीच तासांत होणार. एक्स्प्रेस-वेला ताशी १०० किमी या स्वरूपात तयार केले जात आहे. सध्या सहारनपूर येथून दिल्लीला जाणार्या वाहनांची संख्या सरासरी २३ हजार ५३२ आहे. हा भाग वाघ, हत्ती, डॉल्फिन, नीलगाय, कासवांचे आढळस्थान आहे. म्हणूनच शिवालिकच्या डोंगरातून जंगलाचा अनुभव घेता येईल, असे अधिकार्यांनी सांगितले.
दिल्ली ः दिल्ली-डेहराडून एक्स्प्रेस-वेची पायाभरणी पंतप्रधान मोदींच्या हस्ते डिसेंबरमध्ये दिल्लीत झाली होती. या मार्गाचे काम जलदगतीने सुरू आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपूरपासून डेहराडूनपर्यंत पाणी, वनक्षेत्र असो की डोंगराळ भाग, यांची छेडछाड न करता १८ किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड रोड तयार केला जात आहे. हा मार्ग राजाजी उद्यानाजवळून जातो. हा भारतातील पहिला व आशियातील सर्वाधिक लांब वन्यजीव संरक्षण करणारा पायाभूत प्रकल्प ठरला आहे.
उत्तराखंडला लागून असलेल्या चीन व नेपाळच्या सीमांमुळे या मार्गाचे सामरिक महत्त्वही स्पष्ट होते. कारण या मार्गामुळे लष्कराचा वावर सहज होऊ शकेल. एक्स्प्रेस-वेवर पहिल्यांदाच वन्यजीवांसाठी अंडरपासही तयार करण्याचे काम सुरू आहे. २०२४ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल. त्याशिवाय या मार्गावर विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचादेखील वापर केल्याचे दिसून येईल. वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूटच्या दुर्मिळ होणार्या प्रजाती संवर्धन विभागाचे संशोधक बिवाश पांडव यांनी फॅक्ट फायंडिंगचा सविस्तर अहवाल दिल्यानंतर राष्ट्रीय हरित लवादाने या प्रकल्पाला परवानगी दिली होती.
या प्रकल्पाच्या उभारणीत पर्यावरणाची हानी होता कामा नये, त्यामुळेच बांधकामाच्या काळात आता एनजीटीच्या निर्देशानुसार १२ सदस्यीय समिती दरमहिन्याला अहवाल देण्याचे काम करीत आहे. त्यात वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, उत्तराखंड प्रदूषण नियंत्रण मंडळ व इतर विभागांतील सदस्यांना समाविष्ट करण्यात आले आहे. आधी सुमारे ४० हजारांवर झाडांची कत्तल केली जाणार होती, परंतु नंतर हानी कमी करण्याच्या उद्देशाने ही संख्या १२ हजारांवर आणली गेली.