
पल्लवी अशाच पंक्च्युअल ब्युटिशिअनपैकी एक. जीवनात फार चढ-उतार पाहिल्यानंतर आता मुलीला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगत धडपड करणार्या या ३५ वर्षीय युवतीची ही कथा. घरची श्रीमंती असतानाही एका मध्यमवर्गीय मुलाशी लव्ह मॅरेज केल्यानंतर सुरू झालेला खडतर प्रवास. त्यात पतीची तिला आणि तिची पतीला पदोपदी साथ. भाड्याचे घर तेही उभे राहिले, तर डोक्याला पत्रा लागेल असे. लग्नाआधी बेसिक पार्लरचा कोर्स पूर्ण झालेला. पतीने तिला नर्सिंग करण्याचा सल्ला दिला. पतीला जेमतेम तीन हजार रुपये पगार. यातूनही दरमहा दोनशे रुपये फंडात भरत होते. तेथून काही कर्ज उचलून नर्सिंगला ॲडमिशन घेतल्यावर तिने कधी मागे वळून पाहिले नाही. नर्सिंगच्या परीक्षेत ६० मुलींमध्ये पहिली आलेली पल्लवी सराव म्हणून हॉस्पिटलमध्ये तीन शिफ्टमध्ये काम करू लागली.
लव्ह मॅरेज असल्याने माहेरी कोणी बोलत नव्हते. घर लांब उंच डोंगरावर, पाण्याची वानवा. पिण्याचे पाणीदेखील पायी; डोंगर उतरून तीन हंडे डोक्यावर आणणे हे सर्व एका नारीच्या शक्तीचे कौतुक करणारेच आहे.
दोन वर्षांनंतर घरात एका चिमुकलीचा जन्म झाला. मग या बाळाच्या येण्याने घरात जणू आनंदाला सीमा राहिली नाही. दीर, नंदन, मावससासू यांचेही दिवसही पालटलेच. चिमुकली काही महिन्यांची झाल्यानंतर वडिलांचा मुलीवर असलेला राग शांत झाला. आई-वडिलांनी तिला घरी बोलावून घेतले.
नर्सिंगचा एक वर्षाचा सराव पूर्ण झालेला होता. बाळ पाळणाघरात सोडून अडीच हजार रुपये पगारावर नोकरी लागली. पतीलाही पगारात काही प्रमाणात वाढ होत गेली. मग धडपड सुरू झाली ती स्वत:चे घर घेण्याची पुण्यातील काही जवळची ठिकाणे पाहून झाल्यानंतर एक फ्लॅट आवडला. मग पैशांची जुळवाजुळव करून थोडेसे कर्ज काढून स्वत:चे हक्काचे घर झाले.
नंतर अचानक आईच्या जाण्याने वडिलांची जबाबदारी पल्लवीवर पडली. पती आणि तिने ही जबाबदारी काही वर्षे पेलली. मग नर्सिंग सोडून पतीने तिला पार्लर सुरू करण्याचा सल्ला दिला. वडिलांच्या घराजवळच भाड्याने पार्लर घेतले व सुरू केले. मग बहिणीच्या सल्ल्याने काही नवीन कोर्सेस व गव्हर्न्मेंटचा कोर्सही केला. मधल्या काळात पतीने तिला पदवीधर होण्याचा सल्लाही दिला. तिने ही पदवी अगदी सहज पूर्ण केली. हे सर्व करत असताना पार्लरमध्ये येणार्या अगदी लहान मुलींपासून ते आजीपर्यंत सर्वजणी तिच्याशी आपल्या गोष्टी शेअर करू लागल्या. पल्लवी त्यांना योग्य मार्गदर्शन देऊ लागली. तू एक ‘मार्गदर्शन केंद्र’ सुरू कर असा सल्ला पतीने दिला. कारण तिने दिलेल्या मार्गदर्शनाने बर्याच जणींना योग्य वाट मिळाल्याचे तिच्या मैत्रिणी सांगू लागल्या. मुलगी (ग्रीष्मा) मोठी होत गेली, पण पल्लवीने मुलीशी मैत्रिणीचे नाते निर्माण केले.
शाळेत मित्र-मैत्रिणींमध्ये काहीही झाले, तर ग्रीष्मा आईला सांगितल्याशिवाय राहत नाही. ग्रीष्माला तिने दूरदृष्टीचे ज्ञान, संस्कार अगदी लहानपणापासूनच द्यायला सुरुवात केली. जीवनात काही गोष्टी अशा घडल्या, की स्वत:चे घर असतानाही भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली. पण हे भाड्याचे घर केवळ दोन महिन्यांतच आपण घेऊया असे पतीला तिने सांगितले. पती थोडासा बेचैन झाला. आपल्याला हे जमेल की नाही. आधीच्या घराचे हप्ते सुरू. ‘तू हप्ते भर. मी घर सांभाळेन. मी तुला एकटे पडू देणार नाही.’ पत्नीच्या या वाक्याने जणू पतीला हुरूप आला आणि दोघे लागले पैसे जमवाजवम करायला. कागदपत्रे गोळा करायला. पाहता पाहता पहिल्या फ्लॅटवर लोन मिळाले. काही मित्र, जवळचे नातेवाईक यांनीही मदत केली. टू बीएचके फ्लॅट घेण्याची जिद्द पूर्ण झाली.
पार्लर सुरू असताना अब्रन कंपनीला मुलाखती दिली. तिथे १५ दिवसांचा कोर्स पूर्ण केल्यावर कंपनीने जॉईन करून घेतले. आता घराचे डोईजड होणारे हप्ते, मुलीचे शिक्षण हे सारे खर्च डोळ्यांसमोर दिसत असताना मग पळापळ सुरू झाली. सकाळी सातला घर सोडणारी ही नारी १० ते १२ तास फक्त पळत राहते आणि तेही घरातील सर्व जबाबदारी पूर्ण करूनच. एक बॅग पाठीवर आणि एक हातात असा तिचा प्रवास रणांगणावर लढणार्या झाशीच्या राणीसारखाच भासतो.
(शब्दांकन : नीलम-सुमित्रा)