पुणेराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

घरकुल योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा

आ. संजय जगताप : प्रधानमंत्री आवासच्या बांधकाम कार्यादेशाचे वितरण

सासवड : पीएमआरडीएच्या हद्दीतील पंतप्रधान आवास घरकुल योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. यातील बांधकामाचे ३७० चौरस फुटांचे क्षेत्र आणि गावठाणापासूनचे पाचशे मीटरचे अंतर अशा अटी रद्द करण्यात आल्या असून याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन करून या योजनेत सहभागी नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी दिले.

गुरुवारी सासवड येथे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे, प्रधानमंत्री आवास योजना (जिल्हा) अंतर्गत पुरंदर तालुक्यातील ४३० घरकुलांना आमदार संजय जगताप यांच्या हस्ते बांधकाम परवानगी प्रारंभ प्रमाणपत्र तथा बांधकाम कार्यादेश वितरण करून व मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, पंचायत समितीच्या सदस्या सुनिता कोलते, सोनाली यादव, विठ्ठल मोकाशी, देविदास कामथे, संजय चव्हाण पीएमआरडीएचे भोर, पुरंदर, मावळचे कनिष्ठ शाखा अभियंता विलास आव्हाड, पुरंदरचे समन्वयक नाना कुंभारकर यांसह लाभार्थी नागरिक उपस्थित होते. या वेळी आमदार संजय जगताप यांनी, पुरंदरमधून ६ हजार अर्ज मिळाले आहेत.

ही संख्या १५ हजारांवर गेली पाहिजे. आता यातील बांधकामाचे ३७० चौरस फुटांचे क्षेत्र आणि गावठाणापासूनचे पाचशे मीटरचे अंतर अशा अटी रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पाच ते सात वर्षांतील बांधकामाला वाढीव खोल्यांना परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये १ लाख रुपये महाराष्ट्र शासन आणि दीड लाख रुपये केंद्र शासनाचे अनुदान मिळणार आहे. हे बांधकाम गुंठेवारी अथवा परवानगीमध्ये आडणार नाही. तसेच जिल्हा बँकेकडून बांधकामाला ८ टक्के व्याजदराने तसेच संत सोपानकाका सहकारी बँक बँकेकडून ८.१० टक्के व्याजदराने कर्जपुरवठा होणार आहे. दोन्ही बँकांकडून १५ लाखापर्यंत कर्ज देण्यात येणार असून नागरिकांच्या स्वप्नातील हे घर अधिकृत होणार आहे. भविष्यात पीएमआरडीएमध्ये टप्प्याटप्प्याने शहरीकरण आणि नियोजनबद्ध विकास होणार असून यानिमित्ताने चांगले सीमोल्लंघन होत असल्याचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले.

तर पीएमआरडीएचे अभियंता आव्हाड आणि पुरंदरचे समन्वयक नाना कुंभारकर यांनी ४३० घरकुलांच्या कामांना मंजुरी मिळाली असून वर्क आॅर्डर मिळाली आहे. यापूर्वी या घरकुलांच्या बांधकामाचे क्षेत्र ३७० चौरस फूट एवढे मर्यादित होते. आमदार संजय जगताप आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याने ६०० चौरस फूट तसेच गावठाण पासून पाचशे मिटरच्या आतिल अंतराची अट काढून टाकल्याने वाडी- वस्तीवरही घर बांधता येईल असे सांगितले.

आता ४३० घरकुलांची कामे सुरू होत असून ५७७ बांधकामांना दिवाळीपर्यंत मंजुरी मिळणार आहे. यामध्ये ४०० चौरस फुटांपर्यंत पीएमआरडीए प्लॅन देणार आहे तर ४०० ते ६०० चौरस फुटांपर्यंत बांधकामाचा प्लॅन लाभार्थीने करायचा आहे. तसेच ठेकेदाराची नेमणूकही लाभार्थीने करायची असल्याचे अभियंता आव्हाड यांनी सांगितले. या वेळी लाभार्थी व नागरिकांनी विविध प्रश्न उपस्थित केले. त्यास आमदार संजय जगताप, पीएमआरडीएचे अभियंता आव्हाड यांनी समर्पक उत्तरे दिली. कागदपत्रे, प्रस्ताव करणे, प्लॅन, आदींबाबत मार्गदर्शन केले. संजय चव्हाण
यांनी प्रास्ताविक करून सुत्रसंचलन केले.

याप्रसंगी नामदेव कुंभारकर, भाऊ दळवी, संदिप फडतरे, आण्णा खैरे, हेमंत वांढेकर, अमोल देशमुख, सचिन पठारे, धर्माजी गायकवाड, चंद्रकांत बोरकर, नाना शेंडकर, डॉ मनोज शिंदे, राहुल घारे, संभाजी नाटकर, अमोल काठे, अमोल काळे, विष्णू मोकाशी, धनंजय काळे, यांसह लाभार्थी नागरीक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये