संसारात राहून केलेल्या नामसाधनेत खरे कल्याण

पुणे ः हरिपाठामध्ये नामस्मरणाचे तीन चरण सांगितले आहेत. त्यात नामस्मरण आंतरिक असते. नामजप मौखिक आणि नामघोष एकमुखाने घ्यावा लागतो. संसारात राहून मनुष्याने नामसाधनेवर अधिक भर द्यावा. त्यातच त्याचे कल्याण आहे, असे विचार आळंदी देवाची येथील ह.भ.प.डॉ. रविदास महाराज सिरसाठ यांनी व्यक्त केले. विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत ज्ञानेश्वर, तुकाराम ज्ञानतीर्थ विश्वरूप दर्शन मंच श्रीक्षेत्र आळंदी येथे पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने युनेस्को अध्यासन अंतर्गत लोकशाही, मानवाधिकार, शांती व सहिष्णुतेसाठीचा लोकशिक्षणाच्या अभिनव उपक्रमाच्या समारोप समारंभात ते बोलत होते.
यावेळी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, युनायटेड नेशनचे सदस्य डॉ. राजेंद्र शेंडे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण, सौ. ऊर्मिला कराड, ह.भ.प. तुळशीराम दा. कराड, सौ. उषा कराड, प्रा. ज्योती कराड ढाकणे, प्रा. स्वाती कराड चाटे, एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्रकुलगुरू डॉ. मिलिंद पांडे व ह.भ.प. डॉ. सुदाम महाराज पानेगावकर उपस्थित होते. याप्रसंगी ह.भ.प. डॉ. रविदास महाराज सिरसाठ लिखित ‘हरिपाठ द सिक्रेट ऑफ द सुप्रीम डिव्होशनल’ या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.