ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

सत्यजीत तांबेंविरोधात शुभांगी पाटील रणांगणात, ठाकरे गटानं दिला पाठिंबा

मुंबई | Shubhangi Patil – नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या जागेसाठी काँग्रेसनं (Congress) उमेदवार म्हणून ज्येष्ठ नेते डाॅ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र, सुधीर तांबेंनी माघार घेत आपला मुलगा सत्यजीत तांबेंचा (Satyajeet Tambe) अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. त्यामुळे महाविकास आघाडी कुणाला पाठिंबा देणार, यावरून राजकीय खलबतं सुरू होती. तसंच आज (14 जानेवारी) सकाळपासूनच नाशिक शिवसेनेचे (Shivsena) पदाधिकारी, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांमध्ये बैठकांचं सत्र सुरु होतं. अखेर आज ठाकरे गटाकडून अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना पाठिंबा देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

आज सकाळपासूनच मातोश्रीवर उद्धव ठाकरे, सुभाष देसाई यांच्यासह शिवसेनेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरु होती. तसंच अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील या देखील मातोश्रीवर दाखल झाल्या होत्या. त्यामुळे शुभांगी पाटील यांना शिवसेना पाठिंबा देणार, असं म्हटलं जात होतं.

आता महाविकास आघाडी शुभांगी पाटील यांना पाठिंबा देणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर सध्या नाशिकची जागा ठाकरे गट लढवणार असून शुभांगी पाटील यांना शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे. तसंच लवकरच महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) पाठिंब्याची घोषणाही होण्याची शक्यता आहे.

कोण आहेत शुभांगी पाटील?

शुभांगी पाटील या धुळे येथील भास्कराचार्य संशोधन संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तसंच त्या महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या संस्थापक आणि राज्याच्या अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र स्टुडंट्स असोसिएशनच्या त्या संस्थापकही आहेत. तर जळगावमधील गोपाळ बहुउद्देशीय संस्थेच्या देखील त्या अध्यक्षा आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये