‘कोरोना व्हायरस संपलेला नाही…’- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : सध्या देशात कोरोनाची लाट संपली आहे. तसंच देशातील कोरोना रुग्णांची संख्या सध्या एक हजारांच्या आसपास आढळत असून सर्वच राज्यांमधील कोरोना निर्बंध हटवले गेले आहेत. कोरोना नावाची महामारी संपलीये, अशी आशा वाटत असतानाच कोरोना हा संपलेला नाही, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. कोरोना व्हायरस संपलेला नाही आणि तो पुन्हा कधीही वाढू शकतो, त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी खबरदारी घ्या, दुर्लक्ष करू नका, असं ते म्हणाले आहेत.
“बहुरूपिया कोरोना कधी कोणत्या रुपात परत येईल हे कोणालाच माहीत नाही. देशातील लोकांच्या पाठिंब्यामुळे या करोनाचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी लसींचे जवळपास १८५ कोटी डोस देणे शक्य झाले आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. ते पाटीदार समाजाचे दैवत मानल्या जाणाऱ्या माँ उमियाच्या मंदिराच्या १४ व्या स्थापना दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील वंथली येथे माँ उमिया धामच्या महोत्सव कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करत होते.
यावेळी ते बोलताना म्हणाले, “कोरोना हे एक मोठे संकट होते आणि ते संकट संपले आहे, असं आम्ही म्हणूच शकत नाही. आता जरी तो नसला तरी तो पुन्हा कधी येईल हे आम्हाला माहीत नाही. हा एक ‘बहुरूपिया’ आजार आहे. तो कधीही येऊ शकतो. लोकांचं या आजारापासून रक्षण करण्यासाठी जवळपास लसींचे १८५ कोटी डोस दिले गेले. आपण एवढा मोठा टप्पा गाठला याबद्दल जग आश्चर्य व्यक्त करतंय. परंतु तुमच्या पाठिंब्यामुळेच हे शक्य झाले आहे.”