अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांची धुसफूस चव्हाट्यावर!

मुंबई : (Jayant Patil On Uddhav Thackeray) राज्यातील सत्तासंघर्षामुळे मंत्रीमंडळ विस्तार लांबणीवर पडला त्यामुळे निधीमंडळाचे अधिवेशन देखील लांबणीवर टाकण्यात आले. विधानसभा आणि विधानपरिषद कामगार सल्लागार समित्यांच्या माहितीनुसार येत्या 17 ऑगस्टपासून विधीमंडळाचे अधिवेशन सुरु होणार आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेतेपदावर शिवसेनेने दावा करत यासाठी सेनेकडून आमदार अंबादास दानवे यांची निवड करण्यात आली आहे.
या सर्व पार्श्वभुमीवर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते पद शिवसेनेकडे जाणार या संदर्भात खुद्द अजित पवार म्हणाले होते की, विधानपरिषदेत काँग्रेसची 10 आमदारांची संख्या आहे, तेवढीच राष्ट्रवादीची संख्या आहे. आमच्या दोन्ही पक्षांपेक्षा शिवसेनेची संख्या दोन ने जास्त आहे. आमची संख्या प्रत्येकी १० आहे तर शिवसेनेची संख्या १२ आहे. त्यानुसार, सध्याचा निर्णयही शिवसेनेच्या बाजूने होऊ शकतो असे पवार म्हणाले होते.
दरम्यान, विधिमंडळ अधिवेशन तोंडावर असताना विरोधी पक्षांतले मतभेद पुन्हा एकदा समोर आले. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेस आधीच नाराज असताना आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही शिवसेनेने परस्पर घेतलेल्या निर्णयावर नाराजीचा सूर लावला. विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता नियुक्त करताना मित्रपक्षांना विचारात घ्यायला हवे होते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. तर विरोधकांत एकोपा कायम राहावा अशी अपेक्षा काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. मात्र, हा एकोपा किती दिवस टिकेल हे सांगणे कठीण जात आहे.