ताज्या बातम्यामहाराष्ट्रशेत -शिवार

हिंगोली जिल्ह्यात भीषण पूर परिस्थिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा

हिंगोली | Marathwada Rain Updates – सध्या राज्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसंच काल (8 जुलै) रात्री हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात अनेक गावांमध्ये झालेल्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे अनेक नागरिक अडकून पडले आहेत. गावांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे. या संपूर्ण पूर परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष ठेवून आहेत. त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून यासंबंधी विचारणा केली आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना तात्काळ रेस्क्यू करा आणि योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना कॉल करून सूचना दिल्या आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्यामुळे अनेक घरं पाण्याखाली गेलेली आहेत. तसंच नदीला पूर आल्यामुळे संपूर्ण कुरुंदा गाव पाण्याखाली गेले आहे. दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब कळताच त्यांनी स्वतः दिल्लीवरून हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधून पूरपरिस्थितीचा आढावा घेतला आहे. यावेळी त्यांनी स्वतः पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवून त्यांच्या जेवणाची राहाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी एनडीआरएफ पथके पाठवण्याची सूचना केली. काही कमी जास्त लागल्यास स्वतः कळवावे असेही निर्देश त्यांना दिले.

दरम्यान, आसना नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असून, वसमत नांदेड राज्य महामार्गावरील आसना नदी पूल पाण्याखाली जाऊन हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर हजारो हेक्टरवरील सोयाबीन, केळी, ऊस, उडीद, मूग, कापूस, हळद ही  शेतकऱ्यांची पीके पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये