ताज्या बातम्यामहाराष्ट्रविश्लेषण

वारीचे नियोजन म्हणजे व्यवस्थापनशास्त्राचा एक पाठच

पुणे : अतीव श्रद्धा आणि त्या श्रद्धेला काटेकोर नियोजन व कार्यक्षम व्यवस्थापन यांची सक्षम जोड म्हणजे आषाढीची पायवारी. व्यवस्थापनशास्त्राचे शिक्षण देणार्‍या मोठमोठ्या संस्थांमध्ये प्रवेश घेऊनही व्यवस्थापनाचे जे पाठ शिकता येणार नाहीत त्यांचे मूर्तिमंत दर्शन घडते पालखी सोहळ्याच्या नियोजनात आणि व्यवस्थापनात.

प्रचंड संख्येने येणार्‍या आणि चालणार्‍या समाजाचे नियंत्रण, शिस्तबद्ध चलनवलन, राहणे-खाणे-निजणे या सगळ्यांची सोय, सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य, मलमूत्र विसर्जन व कचरा व्यवस्थापन, वाहतुकीचे नियंत्रण आणि पालखीच्या मुक्कामाचे संयोजन यांसारख्या प्रत्येक गोष्टीमध्ये व्यवस्थापनशास्त्राची अगणित सूत्रे दडलेली आहेत. व्यवस्थापनशास्त्राच्या अध्यापक-अभ्यासक विद्यार्थ्यांनी आवर्जून शिकावे, असे वारीच्या व्यवस्थापनाचे हे ‘मॉडेल’ आहे.

शासनव्यवस्था, संस्थान समिती, सोहळ्याचे मालक, सर्व मानकरी, दिंडी समाज यांच्या समविचारातून साकारणारे वारीचे संयोजन आणि व्यवस्थापन म्हणजे ‘पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप’च्या तत्त्वाचे सम्यक् दर्शनच होय.

प्रत्येक दिंडी म्हणजे विशाल अशा पालखी सोहळ्याचे जणू लघुरूपच! दिंडीतील वारकरी, त्यांचे भोजन, नाष्टा, निवासाची व्यवस्था, पाणीपुरवठा, तंबूंची सोय, दिवाबत्ती, औषधपाणी, स्नान, वाटचाल, सामानाची वाहतूक व देखरेख, दिंडीतील हजेरी, चालताना घ्यावयाची काळजी या सगळ्याचे १५-१८ दिवस काटेकोर नियोजन करणे ही दिंडीचालक व दिंडीमालकांची खरोखर एक परीक्षाच असते.

सलग १५-१८ दिवस वाटचाल करताना पालखी सोहळा वाटेवरच्या लहान-मोठ्या गावांत मुक्काम करतो. त्यावेळी या सोहळ्याला सर्व प्रकारच्या पायाभूत सेवासुविधा पुरवताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व्यवस्थापनकौशल्याची खरोखरच कसोटी लागते. पालखीतळ, दिवाबत्ती, संरक्षण, कायदा व सुव्यवस्था, स्वच्छता, पाणीपुरवठा, पालखीनिमित्ताने भरणार्‍या बाजाराचे नियंत्रण हा व्यवस्थापनाचा मोठाच पाठ ठरतो.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये