देश - विदेश

गिरीश बापट फडणवीसांच्या सांगण्यावरून कसब्यात प्रचारासाठी आले? भाजप नेत्यानं स्पष्टच सांगितलं

पुणे : (Sanjay Kakade On Devendra Fadnavis) गिरीश बापट यांची प्रकृती फारशी चांगली नसतानाही त्यांनी गुरुवारी केसरीवाड्यातील मेळाव्याला उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमाला येताना गिरीश बापट यांच्या नाकात नळी होती. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांच्यासोबत ऑक्सिजन सिलेंडरही होता. यावरुन अनेकांनी भाजपवर टीका केली होती. देवेंद्र फडणवीसांच्या आग्रहाखातरच गिरीश बापट मेळाव्याला गेले, असा आरोप करण्यात आला. मात्र, गिरीश बापट हे स्वत:च्या इच्छेने कसबा पोटनविडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. यावरुन विनाकारण वाद निर्माण केला जात आहे, असे वक्तव्य संजय काकडे यांनी केले.

गिरीश बापट यांनी स्वत:च ते १९६८ पासून भाजपच्या प्रचार यंत्रणेत सहभागी असल्याचे सांगितले. घोडा कितीही म्हातारा झाला तरी पळतो, सिंह कितीही म्हातारा तरी मांसच खातो. त्याप्रमाणेच गिरीश बापट साहेबांच्या मनात आणि मेंदूत राजकारणाची खाज आहे. जसं राजकारण येतं तसे ते बाहेर पडतात, मग ते कोणत्याही अवस्थेत असोत. भाजप पक्ष त्यांच्या रक्तात भिनला आहे. ते कसब्यात स्वखुशीने प्रचाराला आले होते, त्यांच्यावर कोणीही दबाव आणला नव्हता. त्यांना त्रास झाला ही बाब आम्हाला मान्य आहे. पण त्यांची इच्छाशक्ती आणि हिंमत पाहून आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना उर्जा मिळते. आम्ही त्यांना सॅल्यूट ठोकतो.

देवेंद्र फडणवीस हे मेळाव्यापूर्वी गिरीश बापट यांच्या घरी गेले होते. पण हा म्हणजे ‘कावळा बसायला आणि फांदी तुटायला’ असा प्रकार घडला. बापट साहेब खरोखर इच्छा असल्यामुळे प्रचाराला आले. गिरीश बापट यांनी पत्रक काढून प्रचारात सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत दिवसागणिक चढउतार येत असतात. कधीतरी तीन दिवस ते रुग्णालयात असतात, तर एखादा दिवस त्यांची प्रकृती चांगली असते. मध्यंतरी ते माझ्या कार्यालयातही आले होते, असे संजय काकडे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये