“पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या शेजारी उभा राहिलो तर…”, जितेंद्र आव्हाडांचं खोचक ट्विट

मुंबई | Jitendra Awhad – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे. ठाण्यातील काही योजनांच्या उद्घाटन कार्यक्रमाचा उल्लेख करत आता पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या शेजारी उभा राहिलो तर पोलीस पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील, असा खोचक टोला आव्हाडांनी ट्विटद्वारे लगावला आहे.
“आज ठाणे महापालिकेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही योजनांचे शुभारंभ आहेत. मला महापालिकेनं या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं आहे, पण ब्रिजच्या उद्घाटनात त्यांच्या 8 फूट अंतरावर माझ्यावर 354 चा गुन्हा दाखल झाला. ते स्वतः साक्षीदार आहेत. आज त्यांच्या बाजुला उभा राहीन आणि पोलीस पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील”, असं खोचक विधान जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे.
पुढे ते म्हणाले, “त्यापेक्षा कार्यक्रमाला न गेलेलं बरं परत पोलीस म्हणतील दबाव होता आणि सीएम म्हणतील तुला माहीत आहेना मी हे करू शकत नाही. तुला कसं कळत नाही.. खरच कळत नाही..चलो ये वक्त भी गुजर जायेगा…u too brutas”, असंही आव्हाड म्हणाले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंब्रा येथील एका उड्डाणपूलाचं लोकार्पण करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते. कार्यक्रम झाल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या वाहनाजवळ आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप भाजपच्या एका महिला पदाधिकारीने केला होता. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांना अटकही झाली होती.