महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर; ठाकरेंची धाकधूक वाढली?

मुंबई – Shivsena Party Crisis : महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यांनतर बंडखोरी करून बाहेर पडलेला शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात शिवसेना कोणाची यावरून वाद सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिंदे गटातील नेत्यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांतील १६ आमदारांच्या पात्रतेवर आक्षेप घेण्यात आला होता. त्यावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.
मागील दीड महिन्यापेक्षा जास्त दिवसांपासून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. काही दिवसांपूर्वी ८ ऑगस्टला यावर सुनावणी होणार असे न्यायालयाकडून सांगण्यात आले होते. ती तारीख पुढे ढकलून नंतर १२ ऑगस्टला सुनावणी होणार असल्याची देखील माहिती देण्यात आली होती. मात्र, आज पुन्हा एकदा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. २२ ऑगस्टला या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.
या प्रकरणाचा निकाल राज्यातील सत्ताकारण मोठ्या प्रमाणात बदलू शकतो. त्याचबरोबर शिवसेना पक्ष कोणाचा असेल हे देखील त्या निकालावरून ठरू शकते. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी जसजशी पुढे जात आहे तशी उद्धव ठाकरे यांची धाकधूक वाढत असल्याचं चित्र आहे.
सध्या या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा यांच्या खंडपीठापुढे आहे. रमण्णा यांनी या प्रकरणाची सुनावणी करताना अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. मात्र, येत्या २६ ऑगस्टला ते निवृत्त होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी त्यांच्या खंडपीठासमोरच कायम राहील याच्या शक्यता कमी राहिल्या आहेत.