मनोरंजनराष्ट्रसंचार कनेक्टसंपादकीय

सुशिक्षित आणि सुसंस्कृत

Thats Life |

खूप वर्षांपूर्वीचे पावसाळी दिवस. लोणावळा एसटी स्टँडवर एका खूप गरीब आणि खूप म्हातार्‍या आजीकडून एक रुपया देऊन बारा आण्याच्या भुईमुगाच्या भाजलेल्या शेंगा घेतल्या आणि एसटीकडे धावलो. एसटी सुटायला वेळ होता. मी खिडकीशी जागा पकडली. तितक्यात मी त्या म्हातार्‍या आजीला निरनिराळ्या एसटी बसेसमध्ये डोकावून लंगडत लंगडत धावत येताना पाहिलं. तिला मी दिसताच तिचे डोळे चमकले आणि ती निर्मळ हसली. तिने हात उंचावून मला चार आणे दिले आणि म्हणाली, भेटला रं तू, लय शोधला म्या तुला. ह्ये घे तुजं चार आनं. म्या म्हटलं तुजं पैसं देण्यासाठी आता फुडला जल्म घ्यावा लागतोय मला बग.

एसटी सुटायला वेळ होता, म्हणून मी तिला थांबायला सांगून आणि शेजार्‍याला ‘येतोय’ अशी खूण करून खाली उतरलो. तिला विचारलं, ‘काय गं आज्जे, एवढ्यासाठी तुझी पाटी तिथे तशीच सोडून मला शोधत आलीस होय?’ त्यावर ती म्हणाली बाबा, आंदळ्याची गुरं द्येव राखतोय बग, आनी बाजूची म्हातारी हाय की लक्ष ठिवाया.

मी विचारलं, आज्जे, राहिले असते चार आणे तुझ्याकडे तर काय झालं असतं गं एवढं? त्यावर ती जे उत्तरली ते मला निरुत्तर
करणारं होतं.

ती म्हणाली, ‘असं बग बाबा, र्‍हायलं असतं चार आनं माज्याकडं तर आपला दोगांचा पुन्ना जल्म काय चुकत न्हवता बग. तुजं चार आनं देन्यासाटी माजा आन् चार आनं घेन्यासाटी तुजा. आन् मी त्येला जबाबदार व्हते. आन् पुन्ना फुडला जल्म कंचा येतुय कुणाला ठावं, माणसाचा, प्रान्याचा की आनखी कुनाचा. म्हंजी आला का पुन्ना चार आन्यासाटी पुन्ना पुन्ना जल्माचा फ्येरा? आणि त्यात आपण पुन्य करतोय की पाप काय म्हाईत, आन् मग ह्ये चक्र बंद व्हनार कदी?

एसटी सुटायला अजून वेळ होता. मी मनात म्हटलं की अजून जरा आजीकडून काही तरी ऐकावं, म्हणून तिला म्हटलं, आज्जे, माझे चार आणे देऊन टाकायचे कुणाला तरी गरीबाला त्यावर ती म्हणाली, आरं, कुनाचं तरी पैसं कुनाला तरी द्यायचा आदिकार मला न्हाय, पैसं तुजं आणि त्यावर मी कशापाई पुण्य कमवू? मी तुजं चार आनं तुला दिलं, आता मी सुटले बग. मी निरुत्तर झालो. तितक्यात कंडक्टर आला, त्याने घंटी मारली, मी पटकन् त्या आजीला वाकून नमस्कार करून एसटीत शिरलो. ती आजी मोठ्या समाधानात पाठमोरी आपल्या पाटीकडे लंगडत लंगडत निघाली होती. माझे डोळे भरून आले होते.

या घटनेतून मी इतकाच बोध घेतला, की माझ्याहून ती कितीतरी अधिक सुसंस्कृत होती आणि म्हणूनच सुखी, समाधानी होती, मी ‘सुशिक्षित’ असेन, पण ती ‘सुसंस्कृत’ होती, म्हणून मी तत्क्षणी तिला गुरुपदाचा मान दिला.

Related Articles

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये