बंगळुरूमध्ये यूपीए आज कात टाकणार

बंगळुरू | लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांची दुसरी बैठक बंगळुरूमध्ये सुरू होत आहे. विरोधकांच्या बैठकीत तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. यात पहिला- लोकसभा निवडणुकीत विरोधकांची एकजूट, दुसरा- जागावाटप आणि तिसरा- यूपीएचे नवे नाव ठरवणे हे असतील.
बैठकीत २६ पक्ष सहभागी होणार असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल यांनी सांगितले. ते म्हणाले, मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत बैठक होणार आहे. सोनिया आणि राहुलही येणार आहेत. बैठकीत समान नागरी संहिता, मणिपूर हिंसाचार, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका, पक्ष फोडण्याची भाजपची रणनीती यावरही चर्चा होईल. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी, आंध्रचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या बैठकीपासून अंतर ठेवले आहे. दुसरीकडे भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी १८ जुलै रोजी दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये एनडीएची बैठक बोलावली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. पाटणा येथे झालेल्या बैठकीत १७ पक्षांचे नेते सहभागी झाले होते. यावेळी विरोधी गट आणखी मजबूत करण्यासाठी आणखी ८ पक्षांना निमंत्रित करण्यात आले. यामध्ये मारुमलार्ची द्रविड मुन्नेत्र कळघम, कोंगू देसा मक्कल काची, विदुथलाई चिरुथाईगल काची, रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी (RSP), ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, इंडियन युनियन मुस्लीम लीग, केरळ काँग्रेस (जोसेफ) यांचा समावेश आहे.
केरळ काँग्रेस (मणी) यांनी सहमती दर्शवली आहे. या नवीन पक्षांपैकी केडीएमके आणि एमडीएमके हे २०२४ च्या निवडणुकीत भाजपचे मित्र होते. यावेळी नितीश कुमार यांनी सध्या सर्व पक्षांना एकत्र करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. विरोधी पक्षांमध्ये पंतप्रधानांचा चेहरा कोण असेल? यावर चर्चा होणार नाही, असे स्पष्ट केले. काँग्रेसअध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांना पुढील बैठकीला येण्याचे निमंत्रण दिले होते.
२६ पक्ष होणार सहभागी
प्रथम विरोधी पक्षांकडे १४ पक्ष होते. आता मात्र तो २६ झाला आहे. विरोधकांची एकजूट करण्यात वरिष्ठ नेत्यांची कसरत सुरू आहे.