“…त्यामुळे मी पुन्हा येईल असं कितीही म्हटलं तरी मोदींची अवस्था फडणवीसांसारखी होईल”, शरद पवारांचा खोचक टोला

औरंगाबाद | Sharad Pawar – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. देशाचे चित्र हे मोदी सरकारला अनुकूल दिसत नाही, त्यामुळे मी पुन्हा येईल असं कितीही म्हटलं तरी त्यांची अवस्था फडणवीसांसारखी होईल, असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला आहे. ते आज (16 ऑगस्ट) औरंगाबादमध्ये बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना शरद पवार म्हणाले की, “चीन हे मणिपूरजवळ आहे त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज आहे. आता घडत असलेल्या सर्व गोष्टी देशाच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहेत. तसंच मणिपूरमध्ये 90 दिवसांपासून संघर्ष सुरू आहे आणि हे अविश्वास ठरावाच्या दिवशी मणिपूरवर फक्त दोन मिनिटे बोलले. बाकी इतर विषयांवर दोन तास बोलले”, अशी खंतही शरद पवारांनी व्यक्त केली.
“मणिपूमध्ये पंतप्रधानानंनी जायला हवं आणि तेथील लोकांना विश्वास द्यायला हवा, पण ते त्यांना महत्त्वाचं वाटलं नाही. त्यांना निवडणुकांच्या तयारीची मीटिंग घेणं महत्त्वाचं वाटलं. मणिपूरमध्ये स्त्रियांची धिंड काढली जाते आणि मोदी सरकार पाहतंय. त्यामुळेच इंडियाची मोदी सरकार विरोधात जनमत करण्याची भूमिका आहे. त्यांनी दिल्लीत केलेल्या भाषणात या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करण्याऐवजी देवेंद्र फडणवीसांचं मार्गदर्शन घेऊन मी पुन्हा येईल असं म्हणाले. पण आता फडणवीस आले मात्र कसे? ते सर्वांनी पाहिलंच आहे त्यामुळे आता हे पुन्हा कसे येतील हे बघावं लागेल”, असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.