पुणे-मुंबई एक्सप्रेस वे लेन जोडण्याचे काम ठरतेय धोकादायक

पुणे ः पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या दोन्ही बाजूंना लोणावळ्याजवळ १००० मीटर लांबीच्या मार्गावर लेन जोडण्याचे काम सुरू आहे. हे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले आहे. सध्या सुरू असलेले बांधकाम हा महामार्गावरील राज्य सरकारच्या ‘मिसिंग लिंक प्रोजेक्ट’चा भाग आहे. परंतु हे बांधकाम अनेक प्रवाशांसाठी चिंतेचा विषय बनले आहे. रस्त्यावरील अनेक पॅचेस फुटले आहेत आणि काँक्रीटचे ब्लॉक्स आणि बांधकाम साहित्य बाजूला टाकण्यात आले आहे. तर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्व खबरदारी घेण्यात आल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
एक्स्प्रेस वे वापरणार्यांना कामाचा इशारा देण्यासाठी आणि सावधगिरीने वाहन चालवण्याचा इशारा प्रत्येक ठिकाणी देण्यात आला आहे. बॅरिकेटस लावण्यात आले आहेत, परंतु हायस्पीड कॉरिडॉरमध्ये काम धोक्याचे आहे. कारण अपघात टाळण्यासाठी ड्रायव्हर्स वेळेत चिन्हे किंवा मशिनरी पाहू शकत नाहीत. हे अत्यंत धोकादायक ठरत आहे. मिसिंग लिंक प्रकल्पामध्ये बायपास बांधणे समाविष्ट आहे, जे घाट विभाग वगळून एक्सप्रेस वे ची एकूण लांबी ६ कि.मी. आणि पुणे ते मुंबई दरम्यानचा प्रवास वेळ २५ मिनिटांनी कमी करेल. याबाबत एमएसआरडीसी अधिकारी म्हणाले, एक्सप्रेस वे वर मान्सूनपूर्व काम एकाच वेळी हाती घेण्यात येत आहे. पावसाळ्यासाठी तयार राहण्याची गरज आहे आणि ड्रेनेज सिस्टिमची साफसफाई करणे, घाट विभागातील मोकळे खड्डे ओळखणे यासह इतर कामे सुरू आहेत.