मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशी यांचा अपघात, आगामी चित्रपटाच्या शूटींगदरम्यान घडली दुर्घटना

मुंबई | Pallavi Joshi Accident – मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) यांचा अपघात (Accident) झाला आहे. पल्लवी जोशी यांचे पती आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ (The Vaccine War) या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हा अपघात घडला आहे. या अपघातात पल्लवी जखमी झाल्या आहेत. सोमवारी (16 जानेवारी) हैदराबादमधील चित्रपटाच्या सेटवर ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबाद येथे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री ‘द व्हॅक्सिन वॉर’ या आगामी चित्रपटाचं शूटींग करत आहेत. या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान एका वाहनाचं नियंत्रण सुटलं आणि त्या वाहनानं सेटवर शूट करत असलेल्या पल्लवी जोशींना धडक दिली. या धडकेत त्यांना दुखापत झाली. तरीही त्यांनी आपला सीन पूर्ण केला आणि नंतर त्या उपचारासाठी रूग्णालयात दाखल झाल्या.
सध्या पल्लवी जोशी यांच्यावर हैदराबाद येथील स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तसंच पल्लवी यांना झालेली दुखापत गंभीर नसून सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, पल्लवी जोशी या ‘द काश्मिर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटात झळकल्या होत्या. तसंच त्यांनी अनेक मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. आता त्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटात काम करत असून या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) आणि अनुपम खेर (Anupam Kher) हे कलाकारही झळकणार आहेत.