शिंदे गटाच्या मंत्र्यांची पुन्हा जिभ घसरली! अंधारेंचा ‘नटी’ असा उल्लेख; यशोमती ठाकूर म्हणाल्या, “ते सद्सद्विवेक बुद्धी ठेऊन…”

जळगाव : (Yashomati Thakur On Gulabrao Patil) शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यात मागील काही दिवसांपासून राजकीय कलगीतुरा रंगल्याने बघायला मिळते आहे. दरम्यान, काल सुषमा अंधारेंच्या आरोपांना उत्तरं गुलाबराव पाटील यांनी त्यांचा ‘नटी’ असा उल्लेख केल्यानंतर सर्वच स्तरावरून गुलाबराव पाटील यांच्यावर टीका सुरू आहे. काँग्रेस आमदार तथा माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनीही गुलाबराव पाटील यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे.
जळगावमध्ये सुषमा अंधारे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी त्यांच्या सभेला परवानगी नाकारली. यामुळे सुषमा अंधारेंनी ऑनलाईन पद्धतीने सभा घेत गुलाबराव पाटलांवर टीका केली होती. “गुलाबराव पाटील यांनी दबावामुळेच आपल्या सभेला परवानगी मिळाली नाही”, असा आरोप त्यांनी केला होता. या आरोपानंतर गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर देताना सुषमा अंधारेंचा उल्लेख ‘नटी’ असा केला. “सुषमा अंधारेंना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. त्यांचा पिक्चर कुठेच चालला नाही, त्यामुळे त्या शिवसेनेत आल्या. ठाकरे गटालाही नटीची गरज होती” असं विधान गुलाबराव पाटील यांनी केले होते.
गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना यशोमती ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली. “सुषमा अंधारे या नेहमीच व्यापक दृष्टीकोन ठेऊन बोलत असतात. बाकी कोणाकडे किती नट्या आहेत, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे या विषयावर न बोललं बरं. मात्र, एका स्रीचा मान-सन्मान आपण ठेवला पाहिजे”, अशी प्रतिक्रिया आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. तसेच “गुलाबराव पाटलांना मी चांगलं ओळखते. ते सद्सद्विवेक बुद्धी ठेऊन नेहमी बोलत असतात. मात्र, त्यांनी हे विधान कसं केलं, याचे कारण समजण्यापलीकडे आहे”, असेही त्या म्हणाल्या.