“…त्यामुळे आघाडीत बिघाडी व्हायला वेळ लागणार नाही”, रामदास आठवलेंचं टीकास्त्र

सांगली | Ramdas Athawale – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यावर निशाणा साधला आहे. आमच्या पाठीशी भीमशक्ती असल्यानं उध्दव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही. ठाकरे-आंबेडकर एकत्र आले तरी कॉंग्रेस -राष्ट्रवादी यांच्यामध्ये जागा वाटपावरुन मतभेद होतील. त्यामुळे आघाडीत बिघाडी व्हायला वेळ लागणार नाही, असा टोला रामदास आठवलेंनी लगावला आहे. ते सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
माझ्या पाठीशी भीमशक्ती असल्यानं ठाकरे -आंबेडकर एकत्र आले तरी त्याचा राजकीय परिणाम फार होणार नाही. राज्यातले शिंदे सरकार (Shinde Government) भक्कम असून पूर्ण काळ टिकेलच, पण 2024 मध्ये मोठ्या ताकदीनं सत्तेवर येईल. संजय राऊत म्हणतात तसे हे सरकार अस्थिर नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे 350 तर एनडीएचे 450 खासदार निवडून येतील. राहूल गांधी हे पंतप्रधान होणार नाहीत. त्यांची भारत जोडो यात्रा भारत तोडो असून अगोदर त्यांनी कॉंग्रेस जोडो यात्रा करायला हवी, असंही रामदास आठवले म्हणाले.
छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दीनिमित्त 5 आणि 6 मे या दिवशी कोल्हापूरला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अधिवेशन आयोजित केले आहे. तसंच 6 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत, असंही आठवलेंनी सांगितलं.