आरोग्यपिंपरी चिंचवड

विश्व हिंदू परिषदेचे आरोग्य सेवा पथक वारकर्‍यांच्या सेवेसाठी सज्ज

पिंपरी : श्रीक्षेत्र देहू जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा व श्रीक्षेत्र आळंदी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांची आरोग्य सेवा करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे आरोग्य सेवा पथक, रुग्णवाहिका व औषधोपचार साहित्य रवाना झाले. त्याचे उद्घाटन भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे व हभप नारायण महाराज आळंदीकर यांच्या हस्ते रुग्णवाहिका व आरोग्य साहित्याचे पूजन करून करण्यात आले.

भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, पिंपरी-चिंचवड मेडिकल असोसिएशनचे सदस्य मधुकर बच्चे, चार्टर्ड अकाऊंटंट राहुल कुलकर्णी, एमक्युएर औषध कंपनीचे संचालक गिरीश घनवट यांच्या उपस्थितीत विश्व हिंदू परिषद, चिंचवड जिल्हा कार्यालय येथे हा सोहळा पार पडला. विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने गेल्या ३० वर्षांपासून आषाढी वारीच्या चारही मार्गांवर पायी चालणार्‍या वारकर्‍यांसाठी मोफत आरोग्य सेवा पुरवली जाते.

या आरोग्य सेवा पथकांबरोबर १० अ‍ॅम्ब्युलन्स, जवळपास ३० तज्ज्ञ डॉक्टर्स, ३० नर्सेस, २५ सेवाभावी कार्यकर्ते अथक सेवा देत असतात. दरवर्षी लाखो वारकरी आपल्या सेवेचा लाभ घेतात.

यामध्ये वारकर्‍यांच्या सर्व आजारांवर चिकित्सा व औषधोपचार केले जातात. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी विहिंप प्रांत संपर्कप्रमुख संजय कुलकर्णी, प्रांत सेवा विभागप्रमुख तुषार कुलकर्णी, प्रांत निधीप्रमुख धनाजी शिंदे, पुणे ग्रामीण विभाग मंत्री नितीन वाटकर, बजरंग दल विभाग सहसंयोजक कुणाल साठे, चिंचवड जिल्हा अध्यक्ष शरद इनामदार, तसेच विहिंप, बजरंग दल पदाधिकारी व कार्यकर्ते आणि आषाढी वारी मुळशी दिंडीचे वारकरी उपस्थित होते.

सूत्रसंचालन चिंचवड जिल्हा मंत्री धनंजय गावडे यांनी केले. सोहळ्यातील वारकर्‍यांची आरोग्य सेवा करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या आरोग्य सेवा पथकाचा हा उपक्रम नक्कीच वारकर्‍यांच्या उपयुक्ततेचा आहे. आपत्कालीन समयी या पथकामुळे मोठी दुर्घटना टाळण्यास मदत होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये