जागा लाटण्यासाठी पेठेत गुंडगिरी! सुप्रसिद्ध लेखक वाघोलीकर यांच्या घरावर बळजबरीने कब्जा?

पुणे : सध्या पुण्यातील जागांचे, घरांचे दर आभाळाशी स्पर्धा करू लागले आहेत. पेठ परिसरात तर रीकन्स्ट्रक्शनचे निघालेले फॅड अनेकांना कोट्यवधी रुपयांची भुरळ पाडू लागले आहेत. अशातच बेकायदा भाडेकरू किंवा सार्वजनिक अथवा अन्य लोकांच्या मालकीच्या जागांवर टपऱ्या टाकून त्या जागा बळकावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.
येथील अनेकांची मुले ही परदेशी शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी आहेत. अनेक कुटुंबे उपनगरांत स्थलांतरित झाली आहेत. परंतु त्यांच्या मालकीची घरे पेठेत आहेत. अशा काही कुटुंबांच्या मालकीच्या जागा किंवा येथे न राहत असलेल्यांचे वाडे आणि जुन्या घरांवर अशा पद्धतीचे बळजबरीचे प्रकार सुरू असल्याचे दिसते.
सुप्रसिद्ध लेखक रिदम वाघोलीकर या कुसंस्कृतीचा सामना करत आहेत. या गुन्हेगारी वृत्तीच्या प्रकारांकडे पोलीस आणि महापालिका किती गांभीर्याने पाहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रविवार पेठेमध्ये वाघोलीकर यांनी त्यांच्या सदनिके १९९०ला एका वृद्ध कुटुंबाला राहण्यासाठी खोली दिली होती. त्यांची असहायता बघून माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्यांना ती जागा दिली.
कालांतराने ती जागा सोडण्यासाठी संबंधित गृहस्थाला अन्यत्र स्वतंत्र फ्लॅट घेऊन दिला. त्याने जागा सोडण्याची तयारी दाखवल्याने रीलीज डिड करून दिले. परंतु आता त्या गृहस्थाच्या नातेवाइकांनी गुंडगिरी करून जागा वाघोलीकर यांच्या ताब्यात देण्यास प्रतिबंध केला. ही जागा बळकवायचीच अशा प्रयत्नात संबंधित आहेत.
वाघोलीकर यांना निनावी कॉल करून धमक्या दिल्या जात आहेत. पुण्यातील पेठ परिसरामध्ये वाढत चाललेले हे प्रकार या शहराची शांतता आणि सुरक्षा भंग करणारे आहेत. यामुळे येथे नागरिकांना दहशतीच्या वातावरणात वावरावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.