‘आमच्या नेत्यांच्या घरात माणसं घुसवून मापं घेतली…’; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी लोकांचं लक्ष वेधून घेण्याकरता या सर्व गोष्टी करत आहेत. आमच्या नेत्यांच्या घरात माणसं घुसवून मापं घेतली आहेत. मात्र आता पुराव्याच्या आधारे गोष्टी मिळाल्या आहेत. मराठी माणसाच्या नावावर राजकारण करुन त्याला लुटण्याचं काम सुरू असल्याचं स्पष्ट झालं आहे. लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा काहींचा प्रयत्न असतोे. मात्र आता जनतेला कळलं आहे. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
आमचा कोणत्याही पक्षाला विरोध नाही मात्र येत्या काळात भ्रष्टाचार आणि राजकारण करुन जनतेची फसवणूक करणाऱ्यांच्या विरोधात लढा असणार आहे. सत्ताधाऱ्यांनी वर्षानुवर्ष या भ्रष्टाचाराच्या विळख्यातून स्वत:च्या प्रोपर्टी तयार केल्या आहेत. भ्रष्टाचार करत महाराष्ट्राची संस्कृती पायदळी तुडवण्याचं काम महाराष्ट्र सरकार करत आहे. महाराष्ट्राची प्रतिमा संपूर्ण देशात मलीन करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे राज्याला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी एक मोठा संघर्ष करावा लागणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.