शिवसेना कुणाची?

शिवसेना कुणाची, या प्रश्नाभोवती महाराष्ट्राचे राजकारण गेले अनेक दिवस फिरत आहे. त्याची दसरा मेळाव्यानिमित्त निकाली कुस्ती मुंबईत पार पडली.
निकाल महाराष्ट्राने बघितला-अनुभवला…आता रडीचा डाव खेळणारे रडतील. कारणं सांगतील परंतु माध्यमकेंद्रित या जगात आता अंपायरच्या निर्णयाची गरज नसते. सारं काही लाइव्ह असतं. जिंकलं कोण, हरलं कोण, हे साऱ्यांना ठाऊक आहे. पण माझ्या मते ही कुस्ती-मुकाबला उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा नव्हता आणि उद्याही नसणार. डाव जेव्हा पटावर सुरू होतो तेव्हा खेळणारे खेळाडू हे फक्त माध्यम असतात. मूळ मुद्दा असतो ‘पणाला’ काय लागलं आहे याचा. या खेळात एका बाजूला महाराष्ट्राचे सार्वभौमत्व, आत्मसन्मान, निष्ठा, तर दुसऱ्या बाजूला मुजोर हुकूमशाही भूमिका आणि अवमानकारक, आपमतलबी, खुनशी अर्थकेंद्रित राजकारण. यात विजय शिंदे किंवा ठाकरेंचा होण्यापेक्षा जो बळी मराठी अस्मितेचा जाणार आहे त्याला रोखणे कशाहूनही अधिक महत्त्वाचं होतं.
मेळावा यशस्वी होणं हे शिवसेनेसाठी आणि ठाकरेंसाठी जितकं गरजेचं होतं त्याहून जास्त गरज होती मराठी माणसाची. त्याला शिवसेनेच्या किंवा ठाकरेंच्या पराभवात स्वत:चा पराभव दिसत होता, त्याच्या मुंबईतल्या अस्तित्वाला लागणारं नख त्याला अस्वस्थ करत होतं. जे लाखो लोक शिवतीर्थावर स्वयंप्रेरणेने हजर झाली ती शिवसेनेसाठी किंवा फक्त ठाकरेंसाठी नाही तर ‘स्वत:’साठी आले होते. त्यांना स्पष्ट जाणीव होती ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ नावाचा माणूस त्यांच्यासाठी लढतोय. त्याच्यासोबत उभं राहणं ही आपली स्वत:ची गरज आहे. दोन्ही विचारमंचावर अनेकांची भाषणं झाली. एकमेकांची मापं काढली. आरोप-प्रत्यारोप केले. सामान्य माणसाची शाब्दिक फुलोरा नसलेली त्यांची आंतरिक तळमळ मनाला भिडत होती.
शिवसेनेसाठी मराठी माणूस वापरण्यापेक्षा, मराठी माणसासाठीच शिवसेनेला वापरलं पाहिजे याचं भान सर्वपक्षीय लोकांंना आलेलं दिसलं म्हणूनच शिवसैनिकांच्या पारंपरिक समर्थकांपेक्षा वेगळी लोकं काल भेटली. झालेलं राजकारण कुणासाठी किती फायद्याचं आणि तोट्याचं याचं गणित नेत्यांना खुशाल मांडूदेत, पण हे सारं किळसवाणं राजकारण सर्वसामान्य मराठी माणसाच्या जिव्हारी लागलंय. ‘कुणी तरी आपल्याला फसवलंय-उल्लू बनवलंय’ ही भावना मनात ठाण मांडून बसली आहे आणि त्याची सल तुम्हाला ठायी ठायी दिसेल. सर्वसामान्य माणसाच्या मनात असलेली खदखद कधी दिसणार ? मराठी माणसाचा राग रोखणं ४० पैशांच्या वेठबिगारीवर काम करणाऱ्या आयटी सेलच्या आवाक्याच्या बाहेरील गोष्ट आहे. ही सुनामीच मोरारजीच्या वारसदारांना रोखणार आहे. उद्धव ठाकरे हे कमी बोलले हे खरं आहे, पण ‘ते आले, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं’ असा तो अाविर्भाव होता.
सत्य-असत्याची सगळी फोलपटं उडून जावीत आणि नितळ प्रामाणिक स्वच्छ दिसावं तितकं पारदर्शी त्यांचं बोलणं होतं.
‘मराठी माणसाची शिवसेना आणि शिवसेनेचा मराठी माणूस’ हे समीकरण पुन्हा एकदा अधिक ताकदीनं स्पष्ट झालं. ️दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री शिंदे यांनी भलं मोठं लांबलेलं स्पष्टीकरण दिलं (वाचलं) अर्थात त्यांनी वाचलेलंही नसावं, की इतिहासाची जेव्हा पुनरावृत्ती होते तेव्हा तो ‘फार्स’ ठरतो. कालचा बीकेसी इव्हेन्ट म्हणजे निव्वळ ठरलेला फार्स होता. भाडोत्री आणलेली माणसं काही बोलण्याच्या आधीच त्यांचे चेहरे सारं काही सांगत होते. जल्लोष नसलेले श्रोते, मरगळ आलेली विचारपीठ, गप्प बसलेले नेतेगण आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी आणलेलं उसनं अवसान काही काही कुणापासूनच लपलं नाही. शिंदे गटाची एक गंमत आहे, की ते जितकं बोलायला जातात तितके उघडे पडत जातात. एकदा यांनी तोंड उघडलं, की त्यांची पत आणि इयत्ता दोन्ही कळते.
आता अशा लोकांनी स्वत:ला ‘विचारांचे वारसदार’ वगैरे म्हणवून घेणं यापेक्षा मोठा विनोद नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे काल महाराष्ट्राने शिंदेंना नाकारले नाही, तर देवेंद्र फडणवीस यांनी जे नरेशन गेल्या दोन-तीन वर्षांत उभं केलं होतं ते महाराष्ट्रीय जनतेनं लाथाडलं.
शिंदेंच्या विचारपीठामागं दोन भल्या मोठ्या क्रेन होत्या आणि त्याच्यावर मोठी फ्रेम टांगलेली होती. शिंदेंची अवस्था त्या फ्रेमसारखीच आहे.जमीनही सुटली आणि वरून भाजपने क्रेनवर टांगलंय. दसरा मेळाव्यामध्ये जनतेने कोणाला नाकारलं असेल, तर ते देवेंद्र फडणवीसांचं आत्मकेंद्रित राजकारण आणि भाजपचं सत्तापिपासू कटकारस्थान. जर कुणी जिंकलं असलं, तर तो सर्वसामान्य माणूस… ज्यानं उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला जिंकवायचं ठरवलंय. मराठी माणसानं आता अधिक सावध व्हावं. कारण आपला इतिहास सांगतो, ‘आपण लढाया जिंकतो, पण युद्ध हरतो’ आणि ही तर फक्त सुरुवात आहे. ️शेवटी हा गट, तो गट, गद्दारी-खुद्दारी, बोके-खोके हे सारे तत्कालीन मुद्दे आहेत. शिंदे गटातल्या चाळीस आमदारांनी आणि बारा खासदारांनी हा ‘दिवार’ सिनेमा नक्की आणि सतत बघावा कारण त्यांनी स्वतःच्याच कपाळावर गद्दार लिहून घेतलंय. आता त्यांना रोजच आपली-परकी विचारणार आहेत, का? आणि का?
डॉ. अमोल अशोक देवळेकर ( शहर उपप्रमुख शिवसेना पुणे )