भगीरथ भालके घेणार भारत राष्ट्र समितीचा झेंडा ?

पंढरपूर : भगीरथ भारत भालके हे आता चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीचा झेंडा हातामध्ये घेऊन आगामी राजकारण करण्याची शक्यता आहे. त्यांना भारत राष्ट्र समितीचे प्रमुख चंद्रशेखर राव यांच्याकडून तसे संकेत देखील दिले असल्याची विश्वसनीय माहिती पंढरी संचारच्या हाती आली आहे.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची सत्ता हातातून गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने देखील भगीरथ भालके यांना थोडेसे बाजूला टाकल्याचे दिसत आहे. एकेकाळी राष्ट्रवादीची नव्याने रुजवत करणाऱ्या भारत भालके यांच्या वैयक्तिक महत्त्वकांक्षा आणि सामर्थ्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष नव्याने पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघात होऊ शकला. परंतु त्यांच्या निधनानंतर भगीरथ भालके यांना पक्षामध्ये तितकेसे महत्त्वाचे स्थान राहिले नाही. सातत्याने अपयशाचे धनी होत असलेल्या भगीरथ भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेसने देखील त्यामुळे साईड कॉर्नर केले असल्याचे चित्र दिसून आले.
मध्यंतरी सहा ते नऊ महिने रेंगाळत असलेले भगीरथ भालके आता नव्याने मतदार संघामध्ये अग्रेसर होत जनसंपर्क वाढवत आहेत. त्यांनी मंगळवेढावरती लक्ष केंद्रित केले आहे आणि पुढील आमदारकीसाठी आपण स्वतः उमेदवार असल्याचे देखील संकेत त्यांनी दिले आहेत.
भारतीय जनता पक्षाकडे प्रशांत परिचारक, समाधान आवताडे हे नेते उमेदवारीचे दावेदार आहेत. तर राष्ट्रवादीकडे आता नव्याने आलेले अभिजीत पाटील हे तुम्हाला ठरू शकतात, असे स्पष्ट संकेत शरद पवार यांनी दिले आहेत. अशा स्थितीमध्ये भगीरथ भालके यांना कुठलाही पक्ष नाही म्हणून ते कदाचित भारतीय राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करू शकतात.
भारत राष्ट्र समिती किसान की पार्टी असा उद्देश घेऊन चाललेल्या या पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर राव हे महाराष्ट्रामध्ये आपले पाय पसरत आहेत. त्यांनी सुरुवातीला नांदेड, लोहा, देगलूर या भागामध्ये प्रचंड विराट सभा घेतल्या आणि शेतकऱ्यांनी दलितांचा पाठिंबा मिळण्याचा प्रयत्न केला. दलित आणि शेतकरी विकास हे त्यांच्या प्रचाराचे मुख्य सूत्र आहे. पंढरपूरच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रमध्ये ते या निमित्ताने पाय ठेवू शकतात. उमेदवार निवडून आला नाही तरी किमान पक्षाच्या टक्केवारीची मते वाढवावी आणि प्रस्थापित सत्ताधारी भाजपला मोठे आव्हान निर्माण करावे, ही त्यांची प्राथमिकता आहे. अशा शेतीमध्ये भगीरथ भालके यांच्यासारख्या जनमानसात थोडेफार रूजलेल्या नेतृत्वाला एक व्यासपीठ मिळू शकते आणि राष्ट्र समिती सारख्या पक्षाला एक भरभक्कम आधार मिळू शकतो.