“आम्हाला शेवटच्या चेंडूपर्यंत लढायचं होतं, पण…”, पराभवानंतर कर्णधार हरमनप्रीत झाली भावूक
Women’s T20 World Cup 2023 | काल (23 फेब्रुवार) महिला T20 विश्वचषक 2023 (Women’s T20 World Cup 2023) चा पहिला उपांत्य सामना टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात खेळवला गेला. या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघानं (IND vs AUS) टीम इंडियाचा 5 धावांनी पराभव केला. उपांत्य फेरीतील या पराभवानंतर टीम इंडिया खूपच निराश दिसून आली. यामध्ये विश्वचषकात संघाची धुरा सांभाळणारी टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) देखील भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. तिनं माध्यमांशी बोलताना पराभव स्विकारला. तसंच तिनं सामन्यात संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्जचंही (Jemimah Rodrigues) कौतुक केलं. सोबतच आम्ही पराभवाची अपेक्षा केली नसल्याची खंतही हरमनप्रीतनं व्यक्त केली.
सामन्यानंतर हरमनप्रीत कौर खूपच निराश दिसली. ती म्हणाली की, “माझ्या देशानं मला रडताना पाहावं असं मला वाटत नाही, त्यामुळे मी हा चष्मा घालून आले आहे. मी सर्वांना वचन देते की आम्ही आमचा खेळ सुधारू आणि देशाला पुन्हा असं निराश होऊ देणार नाही. आम्हाला जेमिमाच्या खेळीमुळे गती मिळाली होती. त्यामुळे सामना हरण्याची आम्हाला अपेक्षाच नव्हती. ज्याप्रकारे मी धावबाद झाले, त्यापेक्षा दुर्दैवी काही असूच शकत नाही. आमच्यासाठी प्रयत्न करणं अत्यंत महत्त्वाचं होतं आणि आम्ही सामन्यातील शेवटच्या चेंडूपर्यंत प्रयत्न केले होते. शेवटच्या चेंडूपर्यंत आम्हाला लढायचं होतं. लक्ष्याचा पाठलाग आम्हाला करायचा होता. जेव्हा ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, तेव्हा ते आमच्यासाठी चांगलं होतं. सुरुवातीला आम्ही 2 विकेट झटपट गमावल्या पण आम्हाला माहीत होतं की, आमची फलंदाजी मजबूत आहे.”
पुढे हरमनप्रीत जेमिमा रॉड्रिग्जचं कौतुक करताना म्हणाली, “आम्ही जेमिमाला श्रेय देतो, कारण तिच्यामुळे आम्हाला मोमेंटम मिळाला. अशी चांगली कामगिरी पाहून आनंद झाला. आम्ही चांगली खेळी केली होती. पण क्षेत्ररक्षणात उणिवा होत्या. तसंच आम्ही काही सोप्या कॅचेस सोडल्या”, अशी खंतही तिनं यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, कालच्या सामन्यात टीम इंडियाची सुरूवात खूपच खराब झाली होती. 173 धावांचं लक्ष पूर्ण करण्याचं आव्हान टीम इंडिया समोर होतं. टीम इंडियानं पहिले तीन विकेट 3.4 षटकांत 28 धावांत गमावले. यानंतर कर्णधार हरमनप्रीतनं 34 चेंडूत 52 धावा आणि जेमिमाह रॉड्रिग्जनं 24 चेंडूत 43 धावा करत संघाला सांभाळलं. मात्र त्यांच्या खेळीचा फारसा फायदा झाला नाही आणि त्यांना 5 धावांनी पराभव पत्कारावा लागला.