वाहतूक पोलिसांकडून विनाकारण दंडवसुली

पुणे : तुमच्या गाडीचे हेडलाइट नीट नाहीत, झेब्रा क्रॉसिंगच्या (पट्टे) आतमध्ये गाडी असूनसुद्धा वाहनचालकांना विनाकारण डिवचणे, सीट बेल्ट व्यवस्थित लावले असूनही त्रास देणे, हेल्मेट घालून जात असतानाही मुद्दाम गाडी अडविणे, असे सर्रास प्रकार वाहतूक पोलिसांकडून केले जात आहेत. हे सर्व काही दंड भरण्यासाठीच आहे, असे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही
वाहनधारकांच्या अनेक तक्रारी आहेत. त्या अनुषंगाने पावती न फाडण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना दिले आहेत. वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियंत्रणावरच जास्त भर द्यावा, अशा सूचनासुद्धा देण्यात आल्या आहेत. वाहनचालकांना विनाकारण त्रास देणार्या वाहतूक पोलिसांवर निश्चितच कारवाई करण्यात येईल. नागरिकांना वाहतूक पोलिसांकडून काही त्रास झाल्यास त्यांनी संपर्क साधावा.
अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त, पुणे शहर
सिग्नल सुटल्यानंतर टेम्पोला हात दाखवून पोलिस धावत येतात. नाइलाजास्तव अचानक ब्रेक मारून टेम्पो थांबवावा लागतो. यामुळे अपघाताची शक्यता अधिक असते. कागदपत्रे दाखविल्यानंतरही वाहतूक पोलिसांची फालतू बडबड सुरूच असते.
दादू सोनावणे, टेम्पोचालक (वडगाव शेरी)
अशा वाहतूक पोलिसांवर कारवाईची खरी गरज
बहाणा करून वाहनचालकांना अडवून पोलिसांकडून विनाकारण त्रास दिला जातो. कागदपत्रांची पाहणी करीत असताना गाडीचा वाहन परवाना, पीयूसी, विमा वगळता गाडीचा कर्कश आवाज येतोय, इंडिकेटरमध्ये प्रॉब्लेम्स आहे. अशीही वल्गना करून दंड फाडला जात आहे. समजदार वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत. चुकीचा दंड आकारल्यामुळे बहुसंख्य वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे हे वाहनचालकांची जबाबदारी असते. मात्र, कुठलाही नियमभंग केला नसतानाही दंड ठोठावणे मुळातच चुकीचे आहे.
मी एक छोटा व्यावसायिक असून, कात्रज भागात राहणारा आहे. मला रोज सातारा रोड ते स्वारगेटला कामासाठी जावे लागते. ट्रेझर पार्क कॉर्नरला नेहमीच घोळक्याने पोलिस असतात. तेथे वेगवेगळे कारण सांगून वाहनचालकाला अडवून, कोपर्यात बाजूला नेऊन दंड मागितला जातो. यामध्ये मीसुद्धा बळी पडलो आहे. मला याकरिता दंडाची पावतीसुद्धा दिली नाही.
दीपक निकम, वाहनचालक (जांभूळवाडी, कात्रज)
खरंतर वाहतूक नियमांचे शंभर टक्के पालन करूनसुद्धा चौकाचौकात घोळक्याने उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांकडून चालकांना अडविले जात असल्याचे प्रत्यक्ष दिसून आले आहे. भलेही एखाद्या वाहन चालकाने वाहतूक नियमांचा भंग केला नसेल, तरीही त्यांना केवळ दंडापोटी पोलिसांकडून दम दिला जात असल्याचे चित्र आहे. नंतर कागदपत्रांची मागणी करून किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून विनाकारण दंड वसूल केला जात असल्याचा धक्कादायक वास्तवदर्शी प्रकार एकंदरीत वाहतूक पोलिसांच्या कामगिरीवरून दिसून येत आहे.
शहरातील विविध भागातील चौकाचौकात वाहतूक पोलिस घोळक्यांनी उभे असतात. किमान साधारणतः ५ ते ७ वाहतूक पोलिसांचा घोळका असतो. प्रत्यक्षात घोळक्यातील एक-दोन पोलिस चौकापासून काही अंतरावर कोपर्यात थांबून वाहनचालक येण्याची वाट पाहत असतात. त्याने नियमांचे उल्लंघन केले असो किंवा नसो, त्याची वाहने अडवून त्यांना बाजूला घेत दंडवसुलीचा व कारवाई करण्याचा पाढा वाचला जातो. अखेर भीतीपोटी अथवा हातावर पोट असल्याने कारवाईचा ससेमिरा वाचविण्यासाठी काही वाहनचालक मागणीपेक्षा थोडे पैसे देण्यास तयार होत असतात.
खरं तर बहुतांश वाहतूक पोलिसांना हेच हवं असत. दोन पैसे हातावर पडल्यानंतर त्या वाहनचालकाला सोडून दिले जाते. यामध्ये वाहतूक पोलिसांचा खिसा गरम झालेला असतो. पुन्हा नव्याने एखाद्या चालकाला मुद्दामहून पकडले जाते. हा वाहतूक पोलिसांचा दिनक्रमच बनला आहे.
शहरातील महत्त्वाच्या चौकांच्या कोपर्यात वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. असा प्रकार उघडपणे होत असून सुद्धा वरिष्ठांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने बहुसंख्य वाहन चालकांमध्ये नाराजी व अस्वस्था पसरली आहे.
फेब्रुवारीमध्ये एका टेम्पो चालकावर कारवाई न करण्यासाठी पाच हजाराची लाच मागणार्या वाहतूक पोलिसांवर वाहतूक प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली. या मोठ्या कारवाईनंतर वाहतूक शाखा पोलिसांवर परिणाम झाला नाही.
आजही परिस्थिती जैसे थे च आहे. नो पार्किंगमधील वाहने उचलून टोइंगचे बेकायदा शुल्क उकळणे, वाहनचालक पावती करीत असेल, तरी गाडी ’टोइंग’चा आग्रह धरणे, गाडी उचलणार्या तरुणांची अरेरावी, त्यांच्याच हाती दंडात्मक कारवाई करण्याचे मशीन बेकायदा सोपविण्याच्या तक्रारी वाहतूक पोलिसांविरोधात वाढत आहेत. वाहतूक पोलिसांनी रस्त्यांवर वाहने अडवून दंडात्मक कारवाई करू नये, असा स्पष्ट आदेश सहपोलिस आयुक्तांनी दिला आहे. वाहतूक नियमनाकडे कानाडोळा करून दंडात्मक कारवाईला प्राधान्य देणार्या शहर वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभाराला यामुळे चाप लागणार आहे.