समाजकारण, राष्ट्रकारणाचा वारसा शंकरमामांनी जपला

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींचे गौरवोद्गार
शंकरमामांच्या जीवनचरित्रावर आधारित ’योद्धा’ हे आत्मचरित्र
देशाच्या हितासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याचे आवाहन
निवडणुकीनंतर समाज, गाव, देशाच्या हितासाठी सर्वांनी एकत्रित काम केले पाहिजे. देशाच्या राजकारणात याचा आदर्श महाराष्ट्राने दिला, याचा मला खूप अभिमान आहे. शंकरमामा शेलार यांनी समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारणाचा वारसा जपला असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काढले.
देहूरोड : जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शेती, मावळसाठी प्रेरणादायी, समाजकार्य करणारे वारकरी शंकरमामा लक्ष्मणराव शेलार यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘योद्धा’ या आत्मचरित्राचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देण्यात आला. तसेच पुणे जिल्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी संघचालक, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सुरेशभाई शहा, माजी स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब जांभूळकर यांचा विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी खासदार नानासाहेब ऊर्फ विदुरा नवले होते. मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, माजी मंत्री मदन बाफना, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार कृष्णराव भेगडे, दिगंबर भेगडे, विलास लांडे, पुणे जिल्हा बँकेचे संचालक माऊली दाभाडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार, पिंपरीचे माजी नगरसेवक सुरेश भोईर आदी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, ‘राजकारणात मतभेद असले पाहिजेत. पण मनभेद असता कामा नये हे अटलबिहारी वाजपेयी यांचे हे एक प्रसिद्ध वाक्य आहे. निवडणुकीनंतर समाज, गाव, देशाच्या हितासाठी सर्वांनी एकत्रित काम केले पाहिजे. देशाच्या राजकारणात याचा आदर्श महाराष्ट्राने दिला आहे याचा मला खूप अभिमान आहे.
यशवंतराव चव्हाण यांनी राजकारणाचा पाया रचताना विरोधकांचा मान, सन्मान ठेवला. तीच परंपरा शरदराव पवार, वसंतदादा पाटील यांनी जपली. राजकारण या शब्दाचा अर्थ काय, याचा विचार होण्याची प्रकर्षाने गरज आहे. समाजकारण, राजकारण आणि विकासकारण हा राजकारणाचा अर्थ आहे. सत्ताकारण म्हणजेच केवळ राजकारण नाही. त्यामुळे केवळ पॉवर पॉलिटिक्सचा बोलबोला आहे. वृत्तवाहिन्यांवर कोण काय बोलले हेच दिवसभर दाखविले जाते. याचा कंटाळा आला आहे’’.
‘समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण, राजनीती, लोकनीती, धर्मनीती याचा वारसा शंकरराव, सुरेशभाई, बाळासाहेबांनी जपला याचा मला आनंद आहे. शंकररावांनी समाजकारण, किसान संघाचे काम केले. सुरेशभाई, बाळासाहेबांनी आयुष्यभर राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम केले. पण संघाचे काम लोकांमध्ये पोहोचविण्यात आम्ही कमी पडलो. संघामध्ये कधी जात-पात पाळली जात नाही. पण, संघावर जातीयवादाचा आरोप केला जातो. संघाच्या संस्कारातून आम्ही तयार झालो. समाजामध्ये काम करत असताना राष्ट्र सर्वपरी हे आम्ही मानतो. राष्ट्राच्या विकासासाठी एक आहोत. राष्ट्र सुखी, समृद्ध व्हावे यासाठी काम करतो. कोणतीही व्यक्ती जातीने, धर्माने, राजकीय पक्षाने मोठी नाही. त्याच्या कार्याने कर्तृत्वाने मोठा आहे. आता विचारांमध्ये बदल झाला म्हणून कोण पार्टी बदलत नाही. सत्तेत कोण आहे हे बघून आत्ता पार्टी बदलतात’’, असेही गडकरी म्हणाले.
शंकरमामा शेलार म्हणाले, ‘९० वर्षांतील हा सुवर्णक्षण अनुभवताना परमानंद होत आहे. शतकपूर्तीकडे जाताना सिंहावलोकन करत असताना अनेक कडू-गोड, प्रिय-अप्रिय घटनांना सामोरे गेलो. अपयशाने खचलो नाही. धनाने उतलो नाही. घेतला वसा सोडला नाही. अपमान पचवून पुनश्च हरी ओम म्हणत दुप्पट ताकदीने सामाजिक, राजकीय, धार्मिक काम करत गेलो. समाजकार्य करीत असताना सर्वांच्या सहकार्याने विविध आंदोलने यशस्वी करू शकलो. मन समाधानी आहे. काही महत्त्वाकांक्षा शिल्लक नाही.’