ताज्या बातम्यारणधुमाळी

“…त्यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये नैराश्य”, बाळासाहेब थोरातांनी सांगितलं कारण

मुंबई | Balasaheb Thorat On Shinde Group – सध्या शिंदे गटातील काही आमदार नाराज असून ते उद्धव ठाकरेंच्या गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. यादरम्यान, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी शिंदे गटातील आमदारांमध्ये असलेल्या नैराश्याचं कारण सांगितलं आहे. या सरकारमध्ये नक्कीच गडबड आहे. ज्या पद्धतीनं हे सरकार चालत आहे, त्यामुळे शिंदे गटातील लोकांच्या मनात नैराश्य असल्याचं माझं मत आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. ते औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले, “राज्य सरकार बनलं कसं, सरकार झालं कसं, जनसामान्य माणसांमध्ये त्यांच्याबद्दल काय मत आहे, हे पुन्हा-पुन्हा सांगायची गरज नाही. आधी तर सरकार बनत असताना मंत्रीमंंडळ बनायला तयार नाही, मंत्रीमंडळ झालं तर मंत्र्यांना खातं मिळत नव्हतं आणि खातं मिळाल्यावर पालकमंत्री यांच्या नियुक्तीला उशीर असं सर्व काही पाहायला मिळत आहे. दिल्लीच्या वाऱ्या करता-करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थकून गेले आहेत. त्यामुळे कोण काय करतोय कळतंच नाही”, असा टोला थोरात यांनी लगावला आहे.

“खरं म्हणजे सरकार म्हणून जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष असलं पाहिजे, पण यांचं बिलकुल याकडे लक्ष नाही. राज्याचे प्रकल्प पळवून नेले जात आहेत. मात्र त्याला उत्तर द्यायचं म्हणून काहीतरी उलटे आरोप करायचे असं चाललं आहे. अतिवृष्टीमुळे राज्यात हाहाकार झाला आहे. सोयाबीन पूर्णपणे गेलं असून पीकं पाण्यात गेली आहेत. फळबागांचं नुकसान झालं आहे. पण अजूनही पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. तर काही ठिकाणी कृषी अधिकारी पंचनामे करण्यासाठी पैसे मागत असल्याचं पाहायला मिळत आहे. सरकार म्हणून जनतेच्या प्रश्नांकडे जितक्या काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे, त्याप्रमाणे दुर्दैवानं दिलं जात नाही. काय सुरु आहे हे जनतेला देखील समजत आहे. अनेक मंत्री नुकसानीच्या पाहणीसाठी जात नाही. कारण जनतेच्या समोर जाण्याची हिम्मत त्यांच्यामध्ये नसून, जनतेमध्ये रोष आहे”, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये