ताज्या बातम्यारणधुमाळी

‘…आता तुमचं ऑपरेशन तर करावं लागेल’; संजय राऊतांचा किरीट सोमय्यांना टोला

मुंबई : भाजपा नेते आणि किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावले आहेत. सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिमेच्या नावाखाली गोळा केलेल्या वर्गणीचे पैसे लुटल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केला आहे. यासंदर्भात हे समन्स बजावण्यात आलं आहे. या मुद्द्यावरून आता शिवसेना विरुद्ध भाजपा असा नवा सामना सुरू झाला असून आज संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.

“पोलिसांनी काय समन्स पाठवलेत, हे मला माहिती नाही. पण जबाबासाठी समन्स पाठवल्याचं कळतंय. त्याशिवाय, आयएनएस विक्रांतच्या नावावर लोकांकडून कोट्यवधी गोळा करणारे दोघं बापबेटे पोलिसांसमोर जायला घाबरत आहेत. म्हणून ते अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात गेले आहेत. पण कर नाही तर डर कशाला ही तुमचीच भाषा आहे ना?” असा खोचक सवाल संजय राऊतांनी केला आहे.

पुढे संजय राऊत म्हणाले, देवळात ठेवलेल्या पेटीचाही हिशोब धर्मादाय आयुक्तांना द्यावा लागतो. त्यामुळे धर्मादाय आयुक्तांनीही यांच्यावर कारवाई करायला हवी. तुम्ही आयएनएस विक्रांतच्या नावावर लोकांकडून पैसे गोळा केले आहेत. ५८ कोटी रुपये गोळा केले. हा पोलीस तपासाचा भाग आहे. तुम्ही पैसे गोळा केले, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. धर्मादाय आयुक्तांनी देखील यांच्यावर कारवाई करायला हवी. त्यांच्या परवानगीशिवाय असे पैसे गोळा करता येत नाहीत. देवळात पेटी ठेवता त्याचा देखील हिशोब धर्मादाय आयुक्तांना द्यावा लागतो, असंही राऊत म्हणाले आहेत.

“देश, देव आणि धर्म एकच आहे. हे देशासाठी गोळा केलेले पैसे होते. तुम्हाला त्याचा हिशोब द्यावा लागेल. तुम्ही ते पैसे गोळा करून पचवलेत आणि ढेकर दिली आहे. आता तुमचं ऑपरेशन तर करावं लागेल”, असा टोला देखील राऊतांनी लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये