खारभूमी कळवा वरील अनधिकृत बांधकामावर त्वरित कारवाई करा – जितेंद्र आव्हाडांची मागणी

मुंबई : गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खारभूमी कळवा वरील अनधिकृत बांधकामावर त्वरित कारवाईची मागणी केली आहे. कळवा येथील खार जमिनीवरील खारफुटीवर भराव टाकून बेकायदा बांधकामे उभारणीची कामे सुरू असून या बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमांवर केली आहे. यामुळे ठाणे महापालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्याचबरोबर पालिकेचे अशा बांधकामाकडे दुर्लक्ष होत असल्याचे देखील उघड झाले आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात करोना काळात भूमाफियांनी मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभारली. यावरून टीका होऊ लागल्यानंतर पालिकेने ही बांधकामे जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरू केली होती. या करवाईमुळे बेकायदा बांधकामे उभारणीची कामे थांबल्याचे चित्र होते. परंतु पालिकेची मोहीम थंडावताच भूमाफियांनी पुन्हा बेकायदा बांधकामे सुरू केली आहेत. गेल्या काही दिवसांपासून महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे शहरभर दौरे करत आहेत. तरीही बेकायदा बांधकामे सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. असे असतानाच आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमांवर बेकायदा बांधकामासंदर्भात टिप्पणी करत पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
खारभूमी कळवा वरील अनधिकृत बांधकामावर त्वरित कारवाई करा आधी ११० एकर आता कागदो पत्री ७२ एकर…नंतर उरेल ७ एकर खारफुटी एका दिवसात गायब असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. तसंच त्यासंबंधीचं छायाचित्र देखील त्यांनी प्रसिद्ध केली आहेत.