“जगाच्या इतिहासात सर्वात मोठा निर्णय घेणारे मुख्यमंत्री”, शिंदे गटाच्या मंत्र्याचा आंबेडकरांना टोला
मुंबई : (Gulabrao Patil On Prakash Ambedkar) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात बुधवारी ( ११ जानेवारी ) अडीच तास खलबतं झाली. ही माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. पण, इंदू मिलसंदर्भात ही भेट होती. त्यांनी भाजपाला सोडले तर आमच्यात राजकीय चर्चा होऊ शकते, अन्यथा नाही. आमचा शिवसेनेबरोबर ( ठाकरे गट ) जाण्याचा विचार आहे, असं आंबेडकर यांनी आज ( १२ जानेवारी ) पत्रकार परिषद घेत स्पष्ट केलं. यावर आता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाष्य केलं आहे.
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त गुलाबराव पाटील सिंदखेडराजा येथे आले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री शिंदेंनी कोणाला सोडाव आणि पकडावं हे प्रकाश आंबेडकरांनी सांगण्याची गरज नाही. जगाच्या इतिहासात सर्वात मोठा निर्णय घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत.”
“एकनाथ शिंदेंचा अधिकार खूप मोठा आहे. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विकास आराखड्याबद्दल सगळ्यांना कल्पना आहे. सरकार त्याबद्दल कटीबद्ध आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सिंदखेडमध्ये विकास होणार आहे,” असं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.