डंपर चालकांच्या अपघाताची ‘बंपर खाण’…!

पुणे: स्टोन क्रेशरची ‘ खाण’ असलेल्या वाघोली आणि परिसराला तळीराम डंपर चालकांनी अक्षरश: विळखा घातला आहे, हे चालक दारु पिऊन डंपर चालवत असून (Drunk And Drive) त्यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालक भयभीत झाले आहेत. बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातामुळे सरत्या वर्षाला अपघाताचा नवा ‘ अध्याय’ सुरू झाला आहे, धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या बारा महिन्यांच्या कालावधीत या बेधुंद डंपर चालकांनी तब्बल सात ‘ बळी’ घेतले आहेत. त्यामुळे या डंपर चालकांच्या (Dumper Driver) अपघाताची एक नवी ‘खाण’ निर्माण झाली आहे.
वाघोली आणि भावडी या परिसरात दगडाच्या सर्वाधिक खाणी आहेत, त्याचाच गैरफायदा घेऊन स्थानिक बड्या धेंडानी येथील शेकडो एकर जमीनीवर कब्जा करत त्याठिकाणी स्टोन क्रेशरचा व्यवसाय सुरू केला आहे. मात्र; निसर्गाचे एवढे मोठे वरदान मिळाले असतानाही या दगडखाणीच आता सर्वसामान्यांच्या मुळावर उठल्या आहेत. दारु पिऊन बेदरकारपणे डंपर चालविणे आणि वाहतूक नियमांचा (Transport Rules) भंग करुन हे डंपरचालक वाहतूकीचा चक्काजाम करत आहेत, विशेष म्हणजे हे वास्तव असताना आणि याची इंत्यभूंत माहिती असतानाही या मुजोर डंपर चालकांना आळा घालण्यात यापूर्वीच्या लोणीकंद आणि आताच्या वाघोली पोलीसांना सपशेल अपयश आले आहे. त्यातूनच या डंपर चालकांची मुजोरी आणखीनच वाढत चालली आहे, विशेष म्हणजे त्यांचे मालक म्हणजेच दगडखाण मालक त्यांना अधिकच पाठबळ देत आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे या डंपर चालकांनी गेल्या वर्षभराच्या कालावधीत या रस्त्यावर बेदरकारपणे आणि दारु पिऊन तब्बल सातजणांना चिरडले आहे. अवघ्या तीन ते चार महिन्यांपूर्वीच मद्यधुंद डंपर चालकाने एका आयटी इंजिनिअर महिला आणि त्यानंतर अवघ्या आठच दिवसांमध्ये एका तरुणीला चिरडले होते. विशेष म्हणजे हे दोन्ही अपघात सकाळच्या वेळेत झाले असून याकाळात या रस्त्यावर डंपर चालकांना वाहन चालविण्यास बंदी घातली आहे, तरीही याच काळात हे दोन्ही अपघात झाले होते. तरीही या चालकांना अटक करण्याशिवाय त्यांच्यावर अथवा त्यांच्या मालकांवर पोलीसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यातूनच या चालकांना पोलीस आणि डंपरचे मालकच पाठीशी घालत आहेत का असा यक्ष प्रश्न स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना पडत आहे.
यासंदर्भात जोरदार टीका झाल्यानंतर आणि या डंपर चालकांची मुजोरी अधिकच वाढत असल्याने मध्यतंरी तत्कालीन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांनी खाण मालकांची तसेच चालकांची बैठक आयोजित केली होती, या बैठकीला सर्व मालक आणि चालक यांनी उपस्थित राहाणे आवश्यक असतानाही काही मोजकेच मालक आणि चालक या बैठकीला उपस्थित होते. उर्वरीत चालक आणि मालकांनी पोलीसांचा हा आदेश सपशेल बासनात गुंडाळला होता, त्याचवेळी चालक आणि मालकांचे इरादे स्पष्ट झाले होते, हे वास्तव असतानाच आता या डंपरचाच भीषण अपघात झाल्याने वाघोली पोलीसांच्या समोर या तळीराम चालकांना आवरणे आणि त्यांच्या मालकावर वचक ठेवणे याचे मोठे आव्हान असणार आहे.