देश - विदेशरणधुमाळी

संघ-भाजपची विचारसरणी नष्ट करणे

काँग्रेसनेते राहुल गांधी यांचे उद्दिष्ट

गेहलोत राहुल यांची भेट घेण्यासाठी कोचीला जाणार आहेत. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले, राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारावे, यासाठी मी आणखी एक प्रयत्न करीत आहे. राहुल गांधींच्या होकार किंवा नकारानंतरच मी परत येईल. त्यानंतर पुढील रणनीती निश्चित केली जाईल. दिल्लीत पोहोचल्यानंतर गेहलोत यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना अध्यक्षपदी किंवा मुख्यमंत्रिपदी माझी गरज वाटत असेल तर मी नकार देऊ शकत नाही. माझ्यासाठी पद महत्त्वाचे नाही. एक पद, एक व्यक्तीचा नियम केवळ नॉमिनेटेड पदासाठी आहे. निवडणूक लढवून कुणीही २ पदांवर राहू शकते.

नवी दिल्ली : काँग्रेस निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी पक्षाच्या अध्यक्षपदासाठी गुरुवारी अधिसूचना जारी केली. त्यानुसार, उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया २४ ते ३० सप्टेंबरपर्यंत चालेल. त्यात एकाहून अधिक नेत्यांनी उमेदवारी दाखल केली, तर १७ ऑक्टोबर रोजी निवडणूक होईल, तर १९ ऑक्टोबर रोजी निकाल घोषित होईल. दरम्यान, राहुल गांधींनी अध्यक्ष निवडणुकीतील आपल्या भूमिकेवर कोणतेही भाष्य केले नाही. पण एका व्यक्तीकडे एकच पद राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

भारत जोडो यात्रेवर निघालेल्या राहुल यांनी गुरुवारी कोचीमध्ये पत्रकार परिषद घेतली. पत्रकारांनी त्यांना पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याविषयी छेडले असता ते म्हणाले, ‘मी तेच म्हणेल, जे मागच्या पत्रकार परिषदेत म्हटले होते. माझी भूमिका स्पष्ट आहे. जे काही होईल, ते तुम्हाला लवकरच कळेल. माझे काम भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी संपवण्याचे आहे.’

राहुल म्हणाले, ‘काँग्रेस अध्यक्षांचे पद संघटनात्मक नाही. ही एक विचारसरणी आहे. हे पद विश्वासप्रणाली व संकल्पनेचे प्रतिनिधित्व करते. आम्ही एका यंत्रणेशी लढत आहोत, ज्यांच्याकडे अपार पैसा आहे व जे कुणालाही खरेदी करू शकतात.’

भारत जोडो यात्रा केवळ एक दिवस उत्तर प्रदेशात राहण्याच्या प्रश्नावर राहुल म्हणाले, ‘आम्ही बिहार, गुजरात व बंगाललाही गेलो नाही. आमच्या यात्रेचा उद्देश भारताच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्याचा आहे. आमच्याकडे उत्तर प्रदेशाविषयी ठोस व्हिजन आहे.’ केरळच्या डाव्या सरकारवर टीका न करण्याच्या मुद्यावर ते म्हणाले, ‘ही यात्रा काढण्याचा माझा उद्देश लोकांना भेटणे व त्यांना समजून घेण्याचा आहे. मी द्वेष पसरवण्यासाठी घराबाहेर पडलो नाही. गरीब जनतेला महागाई व बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. माझा त्यांना एकसंध करण्याचा प्रयत्न आहे. मी विचारधारेने डाव्या संघटनांशी सहमत नाही.’

विद्यमान स्थिती पाहता काँग्रेस अध्यक्षपदासाठी काँग्रेस खासदार शशी थरूर व राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. मिस्त्रींनी पक्षातील सर्वच कार्यकर्त्यांना निवडवणूक लढवण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे.

अध्यक्षपदाच्या शर्यतीत गेहलोत आघाडीवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. यासंबंधी त्यांनी बुधवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यांच्यातील चर्चेचा तपशील अद्याप समजला नाही. पण माध्यमांच्या वृत्तानुसार, सोनियांनी त्यांना आपण निवडणुकीत कुणाचीही बाजू घेणार नसल्याचे सांगितले आहे. राहुल याप्रकरणी राहुल गांधी यांचीही भेट घेणार आहेत.
मी पक्ष मजबूत होईल, त्या पदावर राहील.

यावेळी गेहलोत यांना सीएम व अध्यक्ष या दोन्ही पदांविषयी विचारले असता, त्यांनी मी कुठे राहील, हे सांगता येणार नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, मी कुठे राहील हे येणारा काळ सांगेल. मी अनेक पदांवर काम केले आहे. त्यामुळे माझी कोणत्याही पदावर राहण्याची इच्छा नाही. पण माझ्या उपस्थितीचा पक्षाला फायदा झाला पाहिजे. काँग्रेस मजबूत झाली पाहिजे, हीच माझी इच्छा आहे. दुसरीकडे, खासदार शशी थरूर यांनी सकाळी काँग्रेस मुख्यालयात जाऊन पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाची भेट घेतली. पक्षाचे दोन्ही नेते अध्यक्ष पदाची निवडणूक लढवू शकतात.

शशी थरुर यांनी 19 सप्टेंबर रोजी सोनिया गांधींची भेट घेतली. त्यात त्यांनी सोनियांना निवडणूक लढवण्याची परवानगी मागितली. पण सोनियांनी हा निर्णय पूर्णतः थरूर यांचा असल्याचे ठणकावून सांगितले. निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय थरुर यांना स्वतःला घ्यावा लागेल. पक्षाची निडवणूक प्रक्रिया ठराविक नियमांनुसार होईल. त्यात सर्वांना समान हक्क असेल, असे सोनिया म्हणाल्या

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये