![दुष्काळातली भटकंती ते सरकारी नोकरी bb2f8eda 6c5e 4f85 a62d d1d481373676](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/04/bb2f8eda-6c5e-4f85-a62d-d1d481373676-780x470.jpg)
आयुष्यात कष्टाशिवाय पर्याय नाही, या वाक्यावर माझा ठाम विश्वास आहे. पुरंदर तालुक्यातील दुष्काळग्रस्त अशा राख गावात माझा जन्म झाला. खेळण्या-बागडण्याच्या, लाडाने हट्ट पुरवून घेण्याच्या वयात आईचं डोक्यावरचं छत्र हरपलं. हलाखीची परिस्थिती असल्याने अगदी शिकायच्या वयातच रोजंदारीवर काम करणं, धुणीभांडी करणं सुरू झाले. इतकंच नव्हे, तर दुष्काळाची तीव्रता वाढली, की शिक्षणाला ब्रेक लावत मामाच्या गावी धुळ्याला जाऊन राहावे लागायचे. हे सगळं करत महाविद्यालयीन शिक्षणासोबत बारावीची परीक्षाही उत्तीर्ण झाले. बारावीच्या परीक्षेचा निकाल लागण्याच्या आतच नातेवाईकांनी दोनाचे चार हात करून टाकले.
संसाराला काही वर्षे उलटली असतील. अशातच घडलेला एक प्रसंग आयुष्याला बराच कलाटणी देणारा ठरला. अंगणवाडीसेविका म्हणून काम करीत असलेल्या रजनी शिंदे सर्वेक्षणासाठी एकदा आमच्या घरी आल्या. वनस्थळी ग्रामीण विकास केंद्राच्या एका अभिनव उपक्रमाची त्यांनी मला माहिती दिली. छंदवर्ग शिक्षिका म्हणून या संस्थेसोबत काम करणार का? म्हणून त्यांनी विचारणा केली. काहीतरी नवीन अनुभव मिळेल, म्हणून अगदी आनंदाने मीही होकार देऊन टाकला. आनंदाची गोष्ट म्हणजे २०१६ पासून संस्थेच्या लोणंद शाखेच्या उपव्यवस्थापिकापदावर काम करण्याची संधीही मिळाली. संस्थेचे काम चालू असतानाच अंगणवाडी मदतनीसची परीक्षाही देऊन पाहिली. अखेरीस तो आनंदाचा प्रसंग माझ्या आयुष्यात आला. २०१७ मध्ये शासकीय अंगणवाडी मदतनीस म्हणून माझी निवड झाली. तब्बल पाच वर्षांच्या या सेवेनंतर आता कामात चांगलाच जम बसला आहे. स्वतःच्या भूतकाळाकडे पाहिलं, की इतरांच्या मदतीला धावून जाणं हाच जगण्याचा हेतू वाटत राहतो.
प्रामाणिकपणे काम करण्याची पावती म्हणूनच की काय, नुकताच खंडाळा पंचायत समितीचा आदर्श अंगणवाडी मदतनीस पुरस्कारानेही माझा गौरव करण्यात आला आहे. दुष्काळाने करावी लागणारी भटकंती ते पुरस्काराच्या मदतीनं पाठीवर पडलेली कौतुकाची थाप हा सगळा प्रवास डोळ्यासमोरून सरकून गेला, की स्वतःलाच थक्क व्हायला होतं. कामाच्या व्यापात स्वतःच्या मुलांकडे दुर्लक्ष झालं. प्रसंगी अंगणवाडीत पाळणा बसवून कामे आटपावी लागली. मदतनीसचं हे काम शासनाच्या योजना महिला, बालके आणि समाजातील तळागाळातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणारं असतं. शेवटी आपल्या वाट्याचं काम आपण प्रामाणिकपणे पार पाडलं तर समाजात योग्य तो बदल पाहायला मिळतो, एवढं मात्र नक्की…