नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला गती मिळणार?

महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित अन युती सरकारने प्रस्तावित केलेले अनेक प्रकल्प मार्गी लागतील अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे.नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला देखील गती मिळणार असे बोलले जात आहे. हा १६ हजार कोटी रुपयांचा रखडलेला प्रकल्प आता लवकरच मार्गी लागेल यासाठी केंद्रस्तरावरून घोषणा होऊन निधीचीही तरतूद होईल अशी या भागातील नागरिकांना आशा आहे.
राज्य शासन आणि रेल्वे मंत्रालयाचा एकत्रित उपक्रम असलेला हा रेल्वेमार्ग अस्तित्वात आल्यास भविष्यात पुणे ते नाशिक प्रवास सुपरफास्ट होईल असे बोलले जात आहे. या प्रकल्पाअंतर्गत २३२ किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग विकसित होणार आहे. हा मार्ग अहिल्यानगर जिल्ह्यातून जाणार आहे. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर, पुणे आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील उद्योग आणि कृषी क्षेत्राला नवीन संजीवनी मिळणार आहे.
हा लोहमार्ग नाशिक-सिन्नर-संगमनेर-नारायणगाव-पुणे असा प्रस्तावित करण्यात आला होता. पण मध्यंतरी या मार्गाच्या रूटमध्ये बदल होईल अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. नाशिक-सिन्नर-शिर्डी-पुणे असा हा मार्ग विकसित होणार असे म्हटले जात होते. यामुळे या तिन्ही जिल्ह्यांमध्ये नागरिकांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळाली. पण आता या प्रकल्पाला गती मिळण्याची अपेक्षा आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या प्रकल्पासंदर्भात मोठी घोषणा केली होती. दरम्यान आता राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे.आता मुख्यमंत्री फडणवीस सेमी हायस्पीड रेल्वेबाबत लवकरच निर्णय घेतील व दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करतील, अशी आशा पल्लवित झाली आहे.