…पालिकेतील शिवसेनेची भ्रष्टाचाराची लंका नष्ट करु; बीएमसी निवडणुकीबाबत नवनीत राणांची घोषणा

मुंबई : खासदार नवनीत राणा यांना रुग्णालयातून डीस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. “मी पूर्ण ताकदीने मुंबई पालिका निवडणुकीत उतरेल आणि पालिकेतील शिवसेनेची भ्रष्टाचाराची लंका नष्ट करू,” असं मत नवनीत राणा यांनी व्यक्त केलं आहे. त्या रविवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पत्रकारांशी बोलत होत्या.
यावेळी नवनीत राणा म्हणाल्या, “दोन पिढ्यांपासून मुंबई महानगरपालिका यांच्याकडे आहे. मात्र, येणाऱ्या काळात मुंबईची जनता आणि रामभक्त त्यांना त्यांची जागा दाखवून देतील. मी पूर्ण ताकदीने मुंबई पालिका निवडणुकीत उतरेल. शिवसेनेने मुंबई पालिकेच्या माध्यमातून भ्रष्टाचाराची लंका तयार केली आहे. ती लंका आम्ही नष्ट करू.”
“मी मुंबईची मुलगी आहे. मुंबईला न्याय देण्यासाठी, चांगला विकास व्हावा यासाठी आणि भ्रष्टाचाराची लंका संपवण्यासाठी मी पालिका निवडणुकीत संपूर्ण ताकदीने प्रचाराला उतरेल. जे रामभक्त आहेत त्यांच्या पाठीशी उभी राहून त्यांना पाठिंबा देईल,” असं आव्हान नवनीत राणांनी शिवसेनेला दिलं आहे.
“मी उद्धव ठाकरे यांना आव्हान देते की तुमच्यात दम असेल तर त्यांनी लोकांमध्ये यावं आणि लोकांमधून निवडून येऊन दाखवा. त्यांनी महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील मतदारसंघ निवडावा, मी त्यांच्याविरोधात उभी राहील आणि निवडून येऊन दाखवू. तेव्हा त्यांना जनतेची ताकद काय असते हे कळेल,” असंही राणा यांनी स्पष्ट केलं आहे.
पुढे नवनीत राणा म्हणाल्या, “माझा ठाकरे सरकारला सवाल आहे की मी अशी काय चूक केली की त्याची मला शिक्षा देण्यात आली. जर हनुमान चालिसाचं पठण करणं आणि भगवान श्रीराम यांचं नाव घेणं गुन्हा असेल आणि त्यासाठी मला १३-१४ दिवसांची शिक्षा ठाकरे सरकारने दिली असेल तर मी १४ दिवस नाही, तर १४ वर्षे तुरुंगात राहण्यास तयार आहे.”