योगींची भावी पंतप्रधानपदाची दावेदारी होणार मजबूत…

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सलग दुसऱ्यांदा विजयासह सत्ता मिळवली आहे. यामुळे आता त्यांचे राष्ट्रीय राजकारणात आणखी एक पाऊल पुढे पडण्याचे मजबूत संकेत मिळाले आहेत. आज दिल्लीचा दौरा करणारे योगी आदित्यनाथ यांची वर्णी भाजपच्या सर्वोच्च संसदीय मंडळात लागणार हे जवळपास निश्चित झाले आहे. सत्तारूढ पक्षाच्या या सर्वशक्तीमान मंडळात स्थान मिळणे हे योगी यांच्या भावी पंतप्रधानपदाची दावेदारी मजबूत करणारे ठरणार आहे.
योगी यांचा भाजप संसदीय मंडळातील संभाव्य प्रवेश हा त्यांची वाटचाल ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच मार्गावरून सुरू आहे. या आदी २०१३ मध्ये मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना भाजपने आधी त्यांचा संसदीय मंडळात समावेश करून नंतर त्यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनाही या मंडळात सामील करून घेण्यात आले. योगी यांचा समावेश झाल्यास ते या मंडळातील दुसरे मुख्यमंत्री ठरणार आहेत.
आज आपल्या दिल्ली दौऱ्यात योगी आदित्यनाथ हे पंतप्रधान मोदी, संररक्षणमंत्री राजनाथसिंह, गृहमंत्री अमित शहा, रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व भाजपाध्यक्ष जे पी नड्डा या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. मोदी यांना भेटल्यावर भाजपकडून त्यांच्या संसदीय मंडळातील समावेशाबाबतची अधिकृत घोषणा होऊ शकते. राजनाथसिह, शहा व गडकरी या तिघांनीही या आधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविले आहे. भाजप संसदीय मंडळात सुषमा स्वराज, अरूण जेटली व अनंतकुमार या दिग्गजांच्या निधनानंतर तीन जागा रिक्त आहेत. त्यामुळे योगी यांचा संसदीय मंडळातील समावेश निश्चित मानला जात आहे.