सरकार पाडण्यासाठी परदेशी षडयंत्र जबाबदार ; हकालपट्टीनंतर इम्रान खानची प्रतिक्रिया
इस्लामाबाद : सध्या पाकीस्तान राजकीय संकटात आहेत. रविवारी पहाटे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना पदावरून हटवण्यात आले. नंतर आज ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, १९४७ ला देश स्वतंत्र झाला असला तरी, राजवटीच्या परकीय कारस्थानाविरुद्ध पुन्हा संघर्ष सुरू झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांचे सरकार पाडण्यासाठी परदेशी षडयंत्र जबाबदार आहेत.
याबद्दल इम्रान खान यांनी वेळोवेळी आरोप केले आहेत. “१९४७ मध्ये पाकिस्तान स्वतंत्र देश झाला. पण सत्ताबदलाच्या परकीय षडयंत्राच्या विरोधात आज पुन्हा स्वातंत्र्य लढा सुरू झाला. देशातील जनता नेहमीच त्यांच्या सार्वभौमत्वाचे आणि लोकशाहीचे रक्षण करते,” असे ट्विट इम्रान खान यांनी केले आहे.एका दिवसाच्या राजकीय नाट्यानंतर इम्रान खान यांना पदावरुन खाली खेचण्यात आले.
सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांचा सभात्याग, सभात्यागावेळी सत्ताधारी व विरोधीपक्षांच्या सदस्यांमध्ये सभागृहातच झालेली हाणामारी आणि शनिवारी मध्यरात्री अविश्वास ठरावावर झालेले मतदान अशा नाट्यमय घडामोडींनंतर पाकिस्तानातील इम्रान खान यांचे सरकार कोसळले आहे. अविश्वास ठरावाच्या बाजूने १७४ मते मिळाली, तर विरोधात शून्य मते मिळाली. अशा प्रकारे पदावरून हटविले जाणारे इम्रान हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. त्यानंतर आज त्यांनी ट्विट करत ही प्रतिक्रिया दिली.