आता वाजले की बारा…!

उद्या ‘मेलडी सिंफनी’मध्ये :
…तुम्हारा इंतजार है!
टेन्शन नै लेने का…
राजकारण्यांचं पेव फुटलंय,
कुणी किडका, कुणी सडका…
दाऊद सापडेल मुंबईत,
फक्त मंत्रालयात हुडका ॥
संजीव शाळगावकर
वा र सोमवार… दुपारचे बारा वाजण्याचा सुमार… एकीकडे वर्षा’वर, तर दुसरीकडे ‘मातोश्री’वर एकच लगबग सुरू… प्रमुख नेत्यांचे मोबाईलकडे लक्ष… काहींचे मोबाइल सतत खणखणतानाचा आवाज… एक प्रकारची उत्सुकता मनातली हुरहूर आणि काहीसा तणाव स्पष्ट जाणवत असलेला… सगळ्यांचे लक्ष घड्याळाकडे… बघता बघता दोन्ही काटे एकत्र आले आणि सगळं संपलं… बारा वाजले !
वेळेचे नव्हे, तर ज्या संभाजीराजेंना शिवसेनेने साकडे घातले होते आणि दुपारी १२ पर्यंतची वेळ दिली होती, ती एव्हाना संपली होती. याचाच अर्थ शिवसेनेची उमेदवारी स्वीकारण्याचे संभाजीराजांनी टाळलं होतं. आता काय होईल? शिवसेना स्वतःचा उमेदवार देईल, संभाजीराजेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करेल…!
मंडळी, हेच सगळं म्हणजेच राजकारण. त्यांनी शिवसेनेची उमेदवारी स्वीकारली असती, तर सगळीकडे संभाजीराजे किती चांगले. शिवसेनेचे प्रवक्ते त्यांचे गोडवे गात सुटले असते अन् आता शिवसेनेपासून दोन हात दूर राहण्याचे त्यांनी ठरवले तर त्यांना पाडण्यासाठी व्यूहरचना आखली जाणार आहे… किती वाईट पद्धतीने राजकारणातील घटना आणि पायंडे सुरू आहेत, याची प्रचीती आली ना! आपला तो बाब्या अन् दुसर्याचं ते कार्ट. दोन दिवसांपूर्वीच घडलेला प्रसंग आठवा ना. ज्या नवनीत राणा आणि रवी राणा यांनी हनुमान चालिसा पठणासाठी मुंबई गाठली. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानासमोर शिवसैनिकांनी प्रचंड गोंधळ घातला, तेच राणा दाम्पत्य शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्याबरोबर लेह, लडाख येथे मजा करतानाचे फोटो मीडियाने प्रसिद्ध केले… राणा दाम्पत्याला देशद्रोहाखाली डांबायला पाहिजे, ही मागणी याच राऊतसाहेबांनी केली होती ना? ते स्वतःच या दाम्पत्याबरोबर गप्पा मारताना, एकमेकांना टाळ्या देताना लडाखमध्ये दिसले. निदान राणा दाम्पत्याला तरी काहीतरी xxx हवी होती. राजकारणाच्या सारीपाटावर काय वाट्टेल ते सुरू आहे. आधी गोंधळ घालायचा, घोटाळे करायचे आणि ते निस्तारण्यासाठी धावपळ करायची, हे आता रोजचंच ठरलं आहे… शेवटी काय, वाट्टेल त्या परिस्थितीत ‘सेटिंग’ लावून दगडाखाली अडकलेले हात अलगद बाजूला काढायचे. आलं का लक्षात. यालाच खर्या अर्थानं राजकारण म्हणत असावेत. या सर्व प्रकारात तुमचे, आमचे आणि सर्वसामान्यांचे केव्हाच बारा वाजले आहेत, हे आपल्या लक्षातसुद्धा येत नाही. आहे की नाही गंमत !
उद्या ‘मेलडी सिंफनी’मध्ये :
…तुम्हारा इंतजार है!