नागपुरात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला २ जागा; उमेदवारही ठरले

कोणत्याही क्षणी राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. अशात सर्वच राजकीय पक्ष जागावाटपात गुंतले आहेत. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाट्याला नागपुरात दोन जागा आल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये ग्रामीणमधील रामटेक आणि शहरातून दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघ यांचा समावेश आहे. दरम्यान, नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागातील दोन आणि नागपूर शहरातील दोन अशा चार विधानसभा मतदारसंघाची उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मागणी केली होती. मात्र आता दोन मतदारसंघावर समझोता झाल्याचे सांगितले जात आहे.
सदर दोन मतदारसंघात ठाकरे गटाने उमेदवारसुद्धा निश्चित केले असून त्यांना खासगीत प्रचार करण्याच्या सूचनाही उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सुरुवातीपासूनच दक्षिण आणि रामटेक या दोन विधानसभा मतदारसंघावर फोकस ठेवला होता. युतीत असताना ग्रामीण भागात दोन आणि शहरातील एका मतदारसंघात शिवसेना लढत होती. महाविकास आघाडीमुळे नागपूर जिल्ह्यातील एका जागेची शिवसेनेची घट झाली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद मानमोडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असल्याचे समजते. मानमोडे यांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. तर रामटेक विधानसभा मतदारसंघातून विशाल बरबटे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे.
दोन्ही जागांची 2019 ची स्थिती –
रामटेक विधानसभा मतदारसंघ हा रामटेक लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. हा विधानसभा मतदारसंघ नागपूर जिल्ह्यात येतो. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत येथे अपक्ष आशिष नंदकिशोर जयस्वाल यांनी विजय मिळवला होता. भाजपचे रेड्डी वरम मल्लिकार्जुन रामा रेड्डी दुसऱ्या क्रमांकावर होते.
नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा नागपूर लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्षाचे मोहन गोपाळराव माटे विजयी झाले. काँग्रेस पक्षाचे गिरीश कृष्णराव पांडव यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.