वाहन चालविण्यातही महिलांचाच ‘डंका’; पुणे महापालिकेच्या प्रशिक्षणात २६९ महिलांच्या हाती ‘ स्टेअरिंग’
संसाराचा गाडा सक्षमपणे हाकत असतानाच महिला वाहन चालविण्यातही अग्रेसर असल्याचे स्पष्ट झाले आहे, पुणे महापालिका प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबीरात तब्बल २६९ महिलांनी गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत ‘ स्टेअरिंग’ हातात घेतले आहे. त्यामुळे वाहन चालविण्यातही महिलांचाच डंका असल्याचे सूचित झाले असून त्या या क्षेत्रातही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्याचे अधोरेखित झाले आहे.
मागील अडीच वर्षांच्या कालावधीमध्ये महापालिकेमार्फत ८५६ लाभार्थ्यांना वाहन प्रशिक्षण देत चालक बनविण्यात आले आहे. यामध्ये २६९ स्त्री आणि ५८७ पुरुष लाभार्थ्यांचा समावेश आहे. महापालिका समाज विकास विभागामार्फत शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांकरिता विविध कल्याणकारी योजना राबविते. या अंतर्गत हे प्रशिक्षण देण्यात आले.
या योजनेमार्फत शहरातील अल्प उत्पन्न कुटुंबांतील नागरिकांकरिता व्यवसाय कौशल्यावर आधारित विविध विषयांचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येतात. समाज विकास विभागामार्फत खासगी संस्थांच्या साह्याने चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण ३० दिवस तसेच वाहनाची तांत्रिक माहिती (मोटार देखभाल – दुरुस्ती) अधिक पाच दिवस असे एकूण ३५ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येते. दररोज ३० मिनिटे आणि पाच किलोमीटर याप्रमाणे २० ते ४५ वयोगटांतील महिला व पुरुषांकरिता विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्यावसायिक वाहन परवाना दिला जातो.