ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्रसिटी अपडेट्स

‘एटापल्ली’च्या 40 आदिवासी युवकांचा ‘विकास’ मार्गावर प्रवास

-त्रिशरण एन्लायटन्मेंट फाउंडेशनतर्फे 10 दिवसांच्या विकासदूत प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन

पुणे | ‘गाव हेच जग’ आणि ‘भवताल हेच जीवन’ या कल्पनेतून बाहेर पडत पहिल्यांदाच हजार किलोमीटरचा प्रवास करून पुण्यात आलेले ते 40 आदिवासी युवक विकास म्हणजे नेमका काय? याचा अभ्यास करताहेत. ‘विकास’ मार्गावर हा त्यांचा प्रवास त्यांच्यासाठी काहीसा बुजरा, नवखा, कुतुहलाचा आणि आश्चर्यकारक असाच आहे. प्रवासासाठी बसमध्ये बसल्यापासून ते पुण्यात उतरल्यानंतर आणि बालेवाडी क्रीडा संकुलातील सोयीसुविधा, इमारती, रस्ते पाहून ही मुले हरखून गेली आहेत.

निमित्त असे, पुण्यातील त्रिशरण एन्लायटन्मेंट फाउंडेशनतर्फे आयोजित 10 दिवसांच्या विकासदूत प्रशिक्षण कार्यशाळेचे! गडचिरोलीच्या एटापल्ली या अतिदुर्गम भागातील 40 युवक व युवती या प्रशिक्षणाच्या निमित्ताने पुण्यात आले आहेत. लॉयड्स मेटल अँड एनर्जी प्रा. लि. आणि सुरजागड लोहखनिज प्रकल्प यांचे या प्रशिक्षण कार्यशाळेसाठी साहाय्य मिळालेले आहे. या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार संपादक अरुण खोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्रिशरण एन्लायटन्मेंट फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रज्ञा वाघमारे, संचालक प्रशांत वाघमारे, माध्यम सल्लागार जीवराज चोले आदी उपस्थित होते.

अरुण खोरे म्हणाले, “रस्ते, वीज, पाणी, नेटवर्क यासारख्या पायाभूत सुविधा या भागात पोहोचलेल्या नाहीत, हे दुर्दैवी आहे. इंडिया आणि भारत हा फरक स्पष्टपणे दाखवणारे हे वास्तव आहे. शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांनी या दुर्गम भागात विकासाची गंगा पोहोचवण्यासाठी काम करायला हवे. चहुबाजूंनी वेढलेले जंगल, निरक्षरता, पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे हे लोक अजूनही पारंपरिक जीवन जगत आहेत. त्यांच्यातील साक्षरतेचे प्रमाण वाढायला हवे. संविधान यांच्यापर्यंत जायला हवे. त्यातून त्यांना त्यांचे अधिकार, हक्क समजतील व त्यांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदत होईल.”

प्रज्ञा वाघमारे म्हणाल्या, “जिथे माणसाला पायी चालायला नीट वाट नाही, अशा भागातून ही मुले-मुली आहेत. पहिल्यांदाच गावाच्या बाहेर पडलेल्या या मुलांना प्रत्येक गोष्टीचे कौतुक आणि कुतूहल आहे. रस्ते नाहीत, वीज नाही, दळणवळणाची साधने नाहीत, मोबाईलला नेटवर्क नाही, चांगल्या शाळा नाहीत, अशा असंख्य समस्यांशी तोंड देत गुजराण करणाऱ्या या आदिवासी समाजातील ही ४० मुले स्वतःसह समाजाचा, एटापल्ली तालुक्याचा आणि गडचिरोली जिल्ह्याचा विकास करण्यासाठी प्रशिक्षित होत आहेत.”

“लॉयड्स मेटल अँड एनर्जीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी या दुर्गम भागामधील लोकांचा आर्थिक, मानसिक, शैस्खनिक, सामाजिक, सांस्कृतिक विकास व्हावा, या उद्देशाने येथील युवकांना प्रशिक्षित करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यांच्या या प्रयत्नांना त्रिशरण एन्लायटन्मेंट फाउंडेशनची साथ मिळाली आहे. ही मुले 10 दिवस पुण्यात राहणार असून, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, विकासाच्या परिकल्पना समजू घेणार आहेत. तसेच पुण्याच्या विविध भागांना, प्रेक्षणीय स्थळांना, प्रकल्पांना, शासकीय कार्यालयांना भेटी देणार आहेत. मेट्रोची सफर या मुलांना घडविण्यात येणार आहे,” असेही वाघमारे यांनी नमूद केले.

जीवराज चोले यांनीही मुलांना प्रोत्साहनपर मनोगत व्यक्त केले व प्रशिक्षण चांगल्या रीतीने पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रशांत वाघमारे यांनी एटापल्ली येथे सुरु केलेल्या आउटरीच सेंटर विषयी, तसेच गडचिरोलीतील गावखेडे आणि तेथील लोकांचे जीवन याविषयी माहिती दिली. अनेक मुलांनी आपल्या एटापल्ली ते पुणे प्रवासाचा सुखद अनुभव सांगितला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये