तासिका तत्त्वावरील ४८६ सहाय्यक प्राध्यापकांना दिवाळीपूर्वी मानधन मिळणार

महाविद्यालयांनी पर्यायी व्यवस्था म्हणुन तासिका तत्वावर सहाय्यक प्राध्यापकांची भरती करण्याचा धडाका लावला आहे. पुणे विभागातील ४२ वरिष्ठ महाविद्यालयातील तासिका तत्त्वावरील ४८६ सहाय्यक प्राध्यापकांना दिवाळीपुर्वी मानधन मिळणार असल्याने या प्राध्यापकांचा दिवाळीतील गोडवा वाढणार आहे. मानधन मिळणार असल्याने या प्राध्यापकांना मोठा दिलासाही मिळणार आहे.
पुणे विभागात पुणे, अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यातील महाविद्यालयांचा समावेश होतो. बहुसंख्य महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापकांची कायमस्वरुपी पुर्णवेळची पदे भरण्यात आलेली नाहीत. महाविद्यालयातील विद्यार्थी संख्येच्या तुलनेत सहाय्यक प्राध्यापकांची १०० टक्के पदे भरण्याबाबत राज्य शासनाकडून सकारात्मकता दर्शविण्यात आलेली नाही. सन २०१८ मध्ये ४० टक्के पदे भरण्याबाबतची सुरु करण्यात आली. ही प्रक्रिया काही महाविद्यालयांनी अद्यापही पुर्णच केलेली नाही.
महाविद्यालयाकडून तासिका तत्वावरील प्राध्यापकांकडून भरमसाठ कामेही करुन घेतली जातात. मात्र त्यांना त्या तुलनेत आर्थिक मोबदला मात्र दिला जात नाही. त्यामुळे तासिका तत्वावरील प्राध्यापकांना अनेक आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे. शासनाकडून मानधनातही फारशी वाढ झालेली नाही. त्यातच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सहाय्यक प्राध्यापकांची मान्यता पत्रे देण्यात खुप विलंब लावला. त्यामुळे प्राध्यापक आणखीनच अडचणीत सापडले.
तासिका तत्त्वावरील सहाय्यक प्राध्यापकांच्या नियुक्तीकरिता कार्यपध्दती निश्चित करण्यात आलेली आहे. तासिका तत्त्वावरिल प्राध्यपकांच्या मानधनाबाबत सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यापीठ मान्यता प्राप्त होताच महाविद्यालयांनी दरमहा नियमीत तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनाची बिले सादर करणे आवश्यक आहे. त्याबाबत परिपुर्ण प्रस्ताव सादर करण्याबाबतचे आदेश पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकांनी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना वारंवार बजाविले होते.
त्यानुसार ४२ महाविद्यालयांनी तासिका तत्त्वावरील सहाय्यक प्राध्यापकांच्या मानधनाबाबतचे परिपुर्ण प्रस्ताव सहसंचालक कार्यालयाकडे सादर केले होते. यासाठी ३ कोटी २७ लाख रुपयांच्या रक्कमेची देयके कोषागार कार्यालयात जमा करण्यात आलेली आहे. महाविद्यालयाच्या खात्यात रक्कम जमा झाल्यानंतर संबंधित महाविद्यालयांना तात्काळ ती प्राध्यापकांना अदा करावी लागणार आहे.