मेकिंग अॅप्सची बाजारपेठ विस्तारली
जगभरात शॉर्ट व्हिडीओ मेकिंग अॅप्सची बाजारपेठ प्रचंड विस्तारली असून, त्यात सातत्याने वाढ नोंदवली जात आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत इन्स्टाग्राम रील्स पहिल्या क्रमांकावर असून, त्यानंतर टिकटॉक तसंच अन्य अॅप्सचा क्रमांक लागतो. इन्स्टाग्राम रिल्समध्ये ६० सेकंदांचा व्हिडीओ तयार करता येतो, तर इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये १५ सेकंदांचा छोटेखानी व्हिडीओ तयार करण्याची मुभा आहे. येत्या काळात शॉर्ट व्हिडीओ मेकिंग अॅप्सच्या मागणीत वाढ होणार आहे.
नवी दिल्ली : जगभरात शॉर्ट व्हिडीओच्या मागणीत प्रचंड वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत लोकप्रियतेच्या शिखरावर असणार्या फोटो शेअरिंग अॅप्सची जागा आता शॉर्ट व्हिडीओ मेकिंग अॅप्सनी घेतली आहे. छोटेखानी व्हिडीओ तयार करून तो शेअर करण्यावर तरुणाईचा भर असल्याचं दिसून येत आहे. इंटरनेट डाटाचे कमी झालेले दर, तसंच प्रत्येकाच्या हातात आलेला स्मार्टफोन या कारणांमुळे शॉर्ट व्हिडीओ मेकिंग अॅप्सची लोकप्रियता शिगेला पोहोचली आहे.
तीस वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांमध्ये छोटेखानी व्हिडीओ तयार करून ते शेअर करण्याकडे कल वाढल्याचं विविध अहवालांमधून समोर आलं आहे. तसंच फोटो शेअरिंग अॅप्सच्या वापरात घट झाल्याचं निरीक्षणही नोंदवण्यात आलं आहे. भारतात टिकटॉकवर बंदी असली तरी जगातल्या अन्य देशांमध्ये या अॅपचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. बंदी येण्याआधी भारतातही टिकटॉक मोठ्या प्रमाणावर वापरलं जात होतं.
टिकटॉकवर बंदी आल्यानंतर त्याला पर्यायी अशी भारतीय बनावटीची अॅप्स उपलब्ध करून देण्यात आली. ही अॅप्सही बरीच लोकप्रिय झाली आहेत. जगभरात टिकटॉकचा वापर वाढत चालल्यामुळे फोटो शेअरिंग अॅप्सच्या वापराचं प्रमाण कमी होत चालल्याचं दिसून आलं आहे. याच कारणामुळे इन्स्टाग्रामवर रिल्स हा नवा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. आज इन्स्टाग्राम रिल्स प्रचंड लोकप्रिय झालं आहे.