पुण्यात भोंग्यांवरून मनसेत दोन गट, भोंगाविरोधक आणि समर्थकांत वाद
पुणे: गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्या उपस्थित करत मशिदींवरील भोंग्यांना विरोध दर्शविला होता. राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर राज्यातील काही ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंदिरावर मोठ्या प्रमाणात लाऊडस्पीकरद्वारे हनुमान चालिसा वाजवण्यात आली. मात्र पुण्यात याचा उलट परिणाम दिसला. राज ठाकरेंच्या वक्तव्यांमुळे नाराज झालेल्या मनसेच्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले.
अशातच आता मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून मनसे पुणे शहरात गोंगाट करणार असल्याचं मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत संभूस यांनी सांगितलं आहे. तर मनसेच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांच्या भाषणाचा मतितार्थच समजलेला नाही असं मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता पुण्यात मनसेचे दोन गट तयार झाल्याचे दिसत आहेत.
या स्थितीमुळे पुण्यात राजकीय घडामोडी जोर धरू लागल्या आहेत. पुण्यातील डेक्कन परिसरातील सर्व मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढण्याबाबत मनसेने पोलीस ठाण्यात पत्र दिले आहेत. त्यांनी डेक्कन पोलीस स्टेशन, विश्रामबाग, फरासखाना पोलिस स्टेशनला याबाबत पत्र दिले आहेत. त्याचबरोबर त्यांनी पोलिसांना भोंगे काढण्यासाठी ४ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. जर भोंगे काढले नाहीत, तर त्याच्या दुप्पट पटीने लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याचं हेमंत संभुस यांनी म्हटलं आहे.
आमच्या पक्षाची कोणाच्याही धार्मिक भावना दुखावायची इच्छा नाही. अथवा आमचा प्रार्थनेलाही विरोध नाही. तरी अनधिकृत भोंग्यामुळे सर्वसामान्य नागरिक, वृद्ध व विद्यार्थी यांना होणार त्रास मनसे खपवून घेणार नाही. त्यामुळे शहरातील अनधिकृत भोंगे काढण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची तसेच पोलीस प्रशासनाची आहे. तसे न झाल्यास मशिदींसमोर दुप्पट पटीने स्पीकर लावून हनुमान चालिसाचे पठन केले जाईल, असे मनसेने म्हटले आहे.
दुसरीकडे, मनसेच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांच्या भाषणाचा मतितार्थच समजलेला नाही. मनसेच्या कार्यकर्त्यांनी शांत राहिले पाहिजे. मी माझ्या प्रभागात तरी मशिदींसमोर भोंगे लावणार नाही, असे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले आहे. सोबतच, राज्याचे सरचिटणीस आणि माजी शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी पक्षात राजसाहेबांचा आदेश अंतिम असून वयक्तिक भूमिकेला थारा नाही, असं ठणकावून सांगितलं आहे. पक्षाची भूमिका राजसाहेबांनी शिवतीर्थावरून मांडली असून शहराध्यक्षांची भूमिका ही पक्षाची भूमिका नाही, असं शिंदे यांनी म्हटले आहे.