“राज ठाकरे मुर्दाबाद, वसंत मोरे जिंदाबाद”; पुण्यातील राष्ट्रवादीच्या आंदोलनात जोरदार घोषणाबाजी
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात मशिदींवरील भोंगे हटवले नाहीत, तर तिथेच समोर लाऊडस्पिकर लावून हनुमान चालिसा वाजवण्याची भुमिका त्यांनी घेतली होती. राज ठाकरे यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. असं असतानाच आज पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने राज ठाकरेंविरोधात आंदोलन केलं. यावेळी राज ठाकरे मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आले. तसेच वसंत मोरे जिंदाबादच्याही घोषणा यावेळी देण्यात आल्या.
मात्र, मनसेचे पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी उघडउघड नाराजी व्यक्त करत आपण अशाप्रकारे मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा लावणार नाही असं म्हटलं होतं. मोरे यांच्या याच भूमिकेमुळे त्यांना काही तासांमध्ये शहर अध्यक्ष पदावरून बाजूला करण्यात आलं. त्यांच्या जागी मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. या सर्व घडामोडी घडत असताना पुणे शहरातील सर्वाधिक मुस्लिम समाज असलेल्या कोंढवा भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज ठाकरे यांच्या भूमिकेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘राज ठाकरे मुर्दाबाद’बरोबरच ‘वसंत मोरे जिंदाबाद’च्या घोषणा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. या आंदोलनामध्ये मुस्लीम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.