ताज्या बातम्यारणधुमाळी

‘मी जेलमध्ये गेलो तर सर्वांना घेऊन बुडणार लक्षात ठेवा…’- खडसेंचं अल्टीमेटम

जळगाव : शरद पवार जळगाव दौऱ्यावर असून यावेळी आयोजीत एका कार्यक्रमात बोलताना एकनाथ खडसे यांनी गृहमंत्र्यांना कडक भूमिका घेण्याचं आवाहन केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रीपदाचा हिसका दाखवा असं सांगत दोन, चार नेत्यांना वर्षभरापूर्वी आत टाकलं असतं तर आज ही परिस्थिती नसती असं विधान केलं आहे. महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यासमोरच एकनाथ खडसे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

“अनेकांचं सहकार्य लागतं, त्याशिवाय मी मुख्यमंत्री शर्यतीपर्यंत गेलो नव्हतो. पोरी बाळींच्या नादी लागून कोणी जात नसतं. त्याला क्षमता लागते. जनतेने ४०-४० वर्ष आम्हाला निवडून दिलं. माझेच पाय धरणारे, बोट धरणारी पोरं आज शिकवू लागलेत आणि शरद पवारांवर बोलू लागले याचं आश्चर्य वाटू लागलं आहे,” असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

पुढे खडसे म्हणाले, “वळसे पाटील यांना मी अनेकदा गृहमंत्रीपदाचा हिसका, इंगा दाखवा असं सांगत असतो. यांची शेकडो प्रकरणं आहेत. दोन चार लोकांना जर वर्षापूर्वी आत टाकलं असतं तर ही परिस्थिती आली नसती. जे सत्य आहे ते करा, कोणाला छळू नका, द्वेषाचं राजकारण करु नका. पण ज्यांनी केले आहे त्यांना भोगायला लावा, तर मग ही परिस्थिती निर्माण होणार नाही.”

“सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असून काही कारण नसताना अनिल देशमुखांच्या घऱावर १०० पेक्षा जास्त धाडी पडतात. आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. मलाही उगाच अडकवण्याचा प्रयत्न झाला. पण मी जेलमध्ये गेलो तर तुम्हालाही घेऊन बुडणार हे लक्षात ठेवा. सरकारला माझी विनंती आहे की, जे सत्य आहे ते जगाच्या समोर आणलं पाहिजे,” असंही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये