पुरस्कारांनी शहरवासीयांची मान उंचावली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘स्मार्ट सिटी’योजना पिंपरी-चिंचवडमध्ये अत्यंत यशस्वीपणे राबवण्यात येत आहे. त्यामुळेच देशभरातील ६२ शहरांच्या स्पर्धेत पिंपरी-चिंचवडला तीन सर्वोत्कृष्ट पारितोषिके मिळाली. ही बाब पिंपरी-चिंचवडकरांसाठी अत्यंत अभिमानाची आहे, असे मत माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.
पिंपरी : भारत सरकार गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने आयोजित स्मार्ट शहरे : स्मार्ट शहरीकरण या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटीने सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. या कामगिरीबद्धल सुरत येथे ओपन डेटा विक, क्लायमेट चेंज आणि प्लेस मेकींग या तीन विविध पुरस्कारांनी शहराला सन्मानित करण्यात आले आहे. स्मार्ट सिटी मिशनचे जॉईंट सेक्रेटरी आणि मिशन डायरेक्टर कुणाल कुमार यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील व सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी पुरस्कार स्विकारले आहेत.
माजी महापौर माई ढोरे म्हणाल्या की, भाजपाच्या सत्ताकाळात प्रशासनाला कामकाजात गतिमानता आणि पूर्णत: मोकळीक मिळाली. त्यामुळे अधिकारी, कर्मचार्यांनी शहराला आपले कुटुंब मानून कामे केली आहेत. विविध स्पर्धांमध्ये शहराला पारितोषिक मिळत आहे. यामध्ये महापलिका अधिकारी, कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे. शहरातील सूज्ञ नागरिकांनी प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य केले. त्यामुळेच शहर विविध स्पर्धांमध्ये आघाडीवर आहे. ‘स्मार्ट सिटी’ची ही यशस्वी वाटचाल निश्चितपणे शहराला प्रगतीच्या शिखरावर पोहोचवणार आहे.
पिंपरी-चिंचवडने ‘ओपन डेटा वीक इव्हेंटमध्ये’सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. तर, प्लेस मेकींग या प्रकारात ७५ तासांत तयार करण्यात आलेल्या सुदर्शन चौकातील ८ टू ८० पार्क ला प्लेस मेकींग मॅरेथॉन विजेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, ऊर्जा आणि हरित इमारती, शहरी नियोजन, हरित आवरण आणि जैवविविधता, गतिशीलता आणि हवेची गुणवत्ता, जल व्यवस्थापन आणि कचरा व्यवस्थापन या पाच श्रेणींमध्ये ठरवून दिलेल्या २८ निकषांनुसार चांगली कामगीरी केल्यामुळे क्लायमेट स्मार्ट सिटीज असेसमेंट फ्रेमवर्क २.० मध्ये ५ पैकी ४ स्टार मिळवून पर्यावरण संतुलन राखण्यात मोलाची कामगीरी केल्याबददल क्लायमेट चेंज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांचा सहभाग आणि महापालिका व स्मार्ट सिटीचे अधिकारी – कर्मचारी यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हा बहुमान मिळाल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी म्हटले आहे.
स्मार्ट सिटीमध्ये भ्रष्टाचार झाला, असा दावा राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू केला होता. वास्तविक, स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळामध्ये राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे आदी तत्कालीन विरोधी पक्षाचे गटनेतेसुद्धा होते. विशेष म्हणजे, महापालिका आयुक्त राजेश पाटील कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांच्यासह सनदी आणि प्रथम वर्ग दर्जाचे अनुभवी अधिकारी आहेत. देशातील ६२ शहराच्या यादीत पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचा अव्वल क्रमांक येतो. अनेक पारितोषिके मिळतात. मात्र, राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडून स्मार्ट सिटीत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केले जातात.
वास्तविक, शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसे अशा तीनही पक्षांचे पदाधिकारी स्मार्ट सिटीत संचालक आहेत. भाजपाचेही तीन सदस्य संचालक आहेत. उर्वरित १० अधिकारी आहेत. काही अधिकारी आयएएस दर्जाचे आहेत. असे असतानाही स्मार्ट सिटीत भ्रष्टाचार झाला, असा दावा करणार्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडून स्मार्ट सिटीच्या कामगिरीवर होणारे आरोप म्हणजे पिंपरी-चिंचवडकरांच्या भावनांशी खेळ आहे. राजकारणासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बिनबुडाचे आरोप करु नयेत, असा सल्लाही माजी महापौर माई ढोरे यांनी दिला आहे.