ताज्या बातम्यारणधुमाळी

‘कालचा हल्ला उद्धव ठाकरेंच्या आदेशानं…’; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

मुंबई : शनिवारी मध्यरात्री उशीरा भाजपा नेते किरीट सोमय्या हे नवनीत राणा आणि रवी राणा यांना भेटायला खार पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते. यावेळी किरीट सोमय्या यांच्या गाडीवर जमावानं दगडफेक केली. त्यावरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. किरीट सोमय्यांनी मध्यरात्रीचा हाय व्होल्टेज ड्रामा झाल्यानंतर ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. “मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. हा तिसरा प्रयत्न झाला आहे. पहिला वाशिम, दुसरा पुणे आणि नंतर खार”, असा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे. या संदर्भात आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या असताना किरीट सोमय्यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत.

यावेळी किरीट सोमय्या म्हणाले, “काल खार पोलीस स्टेशनबाहेर माझ्यावर जो हल्ला झाला, तो ठाकरे सरकारनं स्पॉन्सर्ड केलेला हल्ला होता. मी पोहोचण्याआधीच संध्याकाळी पोलिसांना कळवलं होतं की रात्री मी येणार आहे. पण मी पोहोचण्याआधीच ७०-८० शिवसेना कार्यकर्ते पोलीस स्टेशनच्या आवारात, दाराजवळ जमले होते”, असा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे.

“पोलीस स्थानकात येताना मला शिवीगाळ झाली, गाडी थांबवण्याचा प्रयत्न झाला. परत जाताना मी पोलिसांना सांगितलं की हल्ला होणार आहे. पोलिसांनी व्यक्तिगत जबाबदारी केली की आम्ही आहोत. आम्ही व्यवस्था केली आहे. पण गेट उघडताच ७०-८० गुंडांच्या हवाली माझ्या गाड्या करण्याचं पाप उद्धव ठाकरेंच्या पोलिसांनी केलं. या सगळ्यासाठी पोलीस आयुक्त संजय पांडे जबाबदार आहेत”, असं सोमय्या म्हणाले. या दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री कार्यालय आणि पोलीस आयुक्त संजय पांडे सातत्याने संपर्कात होते, असा खळबळजनक दावा देखील त्यांनी केला आहे.

तसंच सोमय्यांनी पोलिसांनी आपल्याला धमकी दिल्याचा आरोप देखील केला आहे. “एफआयआरमध्ये लिहिलंय की शिवसेना कार्यकर्ते ३ किलोमीटर दूर आहेत. हे पोलीस आयुक्त संजय पांडेंनी लिहून दिलं. माझ्या गाडीवर फक्त एकच दगड आला हे माझ्या नावाने संजय पांडेंनी लिहिलं. ज्या वेळी माझी सही घ्यायला ते आले, मी सांगितलं की मी या मॅनिप्युलेटेड एफआयआरवर सही करणार नाही. तर मला तिथले डीसीपी धमकी देतात की एफआयआर नोंद झाली आहे. तुम्ही सही केली नाही तरी हीच एफआयआर गृहीत धरली जाणार. या प्रकारची गुंडगिरी हे माफिया सरकार करतंय”, असंही ते म्हणाले.

पुढे सोमय्या म्हणाले, “कालचा हल्ला उद्धव ठाकरेंच्या आदेशानं संजय पांडेंनी घडवून आणला. ७०-८० लोक घुसतात कसे कंपाउंडमध्ये? सकाळी केंद्राचे कॅबिनेट सचिव राजीवकुमार गौबा यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी गृहसचिव अजय कुमार भल्ला यांना याविषयी चौकशी करायला सांगितलं आहे. उद्या भाजपाचं शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहे. गृह सचिव आणि इतरांची भेट घेणार आहे. किरीट सोमय्याचा मनसुख हिरेन करायचा असं नियोजन संजय पांडे आणि उद्धव ठाकरेंनी केलं आहे”.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये